Lucknow Crime: उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून एका 18 वर्षीय तरुणीवर ॲसिड फेकल्याची घटना समोर आली आहे. तौसीफ शाह उर्फ मुन्ना (वय 25) याच्यावर हा हल्ला केल्याचा आरोप आहे. तरुणीच्या मदतीसाठी धावलेल्या तिच्या आई-वडिलांवरही आरोपीने चाकूने हल्ला केला. या घटनेत तिचा लहान भाऊही जखमी झाला आहे. तरुणीची प्रकृती गंभीर असून सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
देव दर्शनाला निघालेल्या भक्तांवर काळाचा घाला! रांची- पटना महामार्गावर स्कॉर्पियोचा भीषण अपघात; 4 चिमुकल्यांसह 13 जणांचा जागीच मृत्यू
मुंबई: झारखंडमधील रामगड जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. रांची-पटना राष्ट्रीय महामार्गावर भाविकांना घेऊन ...
घरात घुसून तरुणीवर ॲसिड फेकले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना लखनौमधील हुसैनगंज परिसरात घडली. आरोपी मुन्नाने तरुणीच्या घराची सीमाभिंत ओलांडून आत प्रवेश केला आणि तिच्यावर ॲसिड फेकले. तरुणीने मदतीसाठी आवाज दिल्यानंतर तिचे आई-वडील धावून आले. त्यावेळी आरोपीने त्यांच्यावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. या झटापटीत तरुणीचा लहान भाऊही जखमी झाला.
शेजाऱ्यांनी आरोपीला पकडले
घरातील आरडाओरडा ऐकून शेजारी मदतीसाठी धावले. त्यांनी आरोपीला पकडून मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत मुन्नाही ॲसिडमुळे भाजला असून त्याने स्वतःलाही जखमी करून घेतल्याचा आरोप आहे.
माहिती मिळताच रविवारी पहाटे सुमारे 5 वाजता पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीसह पाचही जखमींना रुग्णालयात दाखल केले. तरुणीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. उपचार सुरू असताना आरोपी पोलिसांच्या देखरेखीखाली आहे, असे सहायक पोलीस आयुक्त अभिषेक कुमार पांडे यांनी सांगितले.
लग्नाच्या प्रस्तावाला नकार दिल्याने हल्ला?
पोलिसांच्या माहितीनुसार, मुन्ना एका कॉम्प्युटरच्या दुकानात काम करतो. त्याला त्याची दूरची नातेवाईक असलेल्या 18 वर्षीय शेजारीणीशी लग्न करायचे होते. मात्र, तरुणी किंवा तिच्या कुटुंबीयांना या प्रस्तावात रस नव्हता. त्यातूनच हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.