संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अॅड मकरंद नार्वेकर मागणी
मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या जुन्या नारळाच्या झाडांवरून नारळ पडून पादचारी तसेच वाहनचालकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अॅड मकरंद नार्वेकर यांनी केली आहे.
सार्वजनिक रस्ते, उद्याने तसेच अधिक वर्दळीच्या ठिकाणी नारळाच्या झाडांना संरक्षण करणाऱ्या जाळ्या अर्थात ‘फॉल प्रोटेक्शन नेट’बसविण्याची मागणी त्यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे केली आहे. या मागणीचे पत्र भिडे यांच्यासह महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनाही देण्यात आले आहे.
पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या अग्निशमन ...
कुलाबा परिसरात मोठ्या संख्येने जुनी नारळाची झाडे असून, या झाडांवरून नारळ किंवा फळे अचानक खाली पडण्याच्या घटना घडतात. त्यामुळे पादचाऱ्यांना दुखापत होण्याबरोबरच रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर अशा घटना टाळण्यासाठी महापालिकेने तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे नार्वेकर यांनी पत्रात नमूद केले आहे.
कुलाब्यातील कुसरो बाग परिसरात रहिवाशांनी स्वतःच्या पुढाकारातून नारळाच्या झाडांना संरक्षण जाळ्या बसविल्या आहेत. या उपायामुळे झाडांवरून पडणारे नारळ थेट वाहनांवर किंवा पादचारी मार्गावर पडण्याचा धोका कमी झाल्याचे नार्वेकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे. याच धर्तीवर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या नारळाच्या झाडांचे महापालिकेने सर्वेक्षण करावे. त्यानंतर रस्ते, उद्याने आणि अधिक वर्दळीच्या परिसरातील धोकादायक ठरू शकणाऱ्या नारळाच्या झाडांवर मजबूत नायलॉन संरक्षण जाळ्या बसवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. ही उपाययोजना तुलनेने सोपी आणि कमी खर्चाची असून, त्यातून अपघात टाळण्यासह नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण होऊ शकते, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.





