मुंबई : मुंबईतील धारावी (Mumbai Dharavi News) परिसरात एका घरात एलपीजी गॅस सिलिंडरचा अचानक भीषण स्फोट (LPG cylinder blast) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेत दोन लहान मुलांसह ५ जण भाजून जखमी झाले आहेत. सिलिंडर बदलण्यासाठी आलेल्या गॅस मेकॅनिकच्या निष्काळजीपणामुळेच हा स्फोट झाल्याचा गंभीर आरोप पीडित कुटुंबाने केला आहे.
राजीव गांधी नगरातील घटना
Building collapse CCTV Fottage : ५ सेकंद अन् ५ मजली इमारत जमीनदोस्त! ६ जणांचा मृत्यू, थरारक CCTV फुटेज आले समोर
नवी दिल्ली : नवी दिल्लीतील सत्य निकेतन भागात रविवारी दुपारी एक अत्यंत धक्कादायक दुर्घटना घडली. मुलांचे पेइंग गेस्ट (PG) नसलेली एक ५ मजली इमारत अवघ्या ...
ही दुर्दैवी घटना सायन-धारावी लिंक रोडवरील राजीव गांधी स्पोर्ट्स क्लबजवळ असलेल्या राजीव गांधी नगरमधील एका दोन मजली इमारतीत घडली. शनिवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास खोली क्रमांक ४३ मध्ये अचानक हा स्फोट झाला. जखमी पूनम जायसवाल यांचे भाऊ विशाल जायसवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील सिलिंडर संपल्यामुळे त्यांनी जवळच्या गॅस एजन्सीतून मेकॅनिकला सिलिंडर बदलण्यासाठी बोलावले होते. सिलिंडर बसवताना मेकॅनिककडून त्याची पिन खराब झाली, ज्यामुळे संपूर्ण खोलीत वेगाने गॅस गळती सुरू झाली.
मेकॅनिकने घाईघाईत पेटवली शेगडी
विशाल यांनी आरोप केला आहे की, खोलीत गॅसचा तीव्र वास येत असतानाही मेकॅनिकने घाईघाईत सिलिंडर चालू आहे हे दाखवण्यासाठी शेगडी पेटवण्याचा प्रयत्न केला. शेगडीची ठिणगी पडताच खोलीत पसरलेल्या गॅसने पेट घेतला आणि जोरदार स्फोट झाला. सुदैवाने, मेकॅनिकने भाजलेल्या अवस्थेतही सिलिंडरचे झाकण बंद केल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की, सहा महिन्यांपूर्वी बसवलेला घराचा मुख्य दरवाजा पूर्णपणे तुटून उडाला. या घटनेत गॅस मेकॅनिकच्या चेहऱ्यालाही दुखापत झाली होती. स्फोटानंतर त्याला उपचारासाठी सायन रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, जखमींचे नातेवाईक आणि संतप्त शेजारी रुग्णालयात जमा झाल्याचे पाहून, लोकांच्या रोषाला सामोरे जाण्याच्या भीतीने तो उपचाराशिवायच तेथून पळून गेला, असा दावा जायसवाल कुटुंबाने केला आहे.
दोन लहान मुलांसह चार जण रुग्णालयात दाखल
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना सायन रुग्णालयात दाखल केले. सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय पूनम जायसवाल (३०% भाजलेल्या), १९ वर्षीय पार्वती गुंडेडी (१५% भाजलेल्या), ५ वर्षांचा रोहन गुप्ता (५% भाजलेला) आणि ४ वर्षांचा रुद्र गुप्ता (८% भाजलेला) यांच्यावर उपचार सुरू आहेत. रोहन आणि रुद्र हे शेजारी राहणारे असून स्फोटाच्या वेळी ते घराबाहेरील गॅलरीत उभे होते, तर पहिल्या मजल्यावर भाड्याने राहणाऱ्या पार्वती गुंडेडी याही या आगीच्या लपेटात आल्या.
स्थानिकांची तत्परता आणि अग्निशमन दलाची कारवाई
स्फोटाचा मोठा आवाज ऐकून आजूबाजूच्या रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशमन दल येण्यापूर्वीच बादल्यांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मुंबई अग्निशमन दलाचे उपप्रमुख संतोष सावंत यांनी सांगितले की, रात्री ११:४५ वाजता घटनेचा कॉल मिळाला आणि १२:१० वाजेपर्यंत आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आधी गॅस सिलिंडरचा नोब पूर्णपणे बंद केला.
पोलिसांकडून परिसर सील; सिलिंडर जप्त
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने सुरक्षेचा उपाय म्हणून तो परिसर सील केला होता आणि रविवारी सकाळी वाहतूक व नागरिकांसाठी खुला केला. अग्निशमन दलाने स्फोट झालेला गॅस सिलिंडर तपासणीसाठी ताब्यात घेतला असून, पोलीस आणि अग्निशमन दल या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.