मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध 'लालबागच्या राजा'च्या (Lalbuagcha Raja 2026) दर्शनासाठी गणेशोत्सवादरम्यान (Ganeshotsav 2026) दरवर्षी लाखो भाविकांची रीघ लागते. या भव्य सोहळ्याचे आणि बाप्पाच्या दर्शनाचे क्षण देश-परदेशातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी वृत्तवाहिन्या तसेच वृत्तपत्रांचे प्रतिनिधीही मोठ्या संख्येने या ठिकाणी तैनात असतात. या वार्तांकनासाठी गणेशोत्सव मंडळाकडून माध्यम कर्मचाऱ्यांना विशेष अधिकृत पास (प्रवेशपत्र) वितरित केले जातात. मात्र, यंदा हेच अधिकृत पासेस सोबत असतानाही पोलिसांकडून पत्रकारांना प्रवेश नाकारत अडवणूक करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
अधिकृत पासेस असूनही पोलिसांकडून रोखठोक
मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवातील विविध घडामोडींचे आणि लालबागच्या राजाच्या दर्शनाचे थेट कव्हरेज करण्यासाठी विविध माध्यमांचे कॅमेरामन व बातमीदार घटनास्थळी पोहोचले होते. मंडळाने दिलेले वैध पासेस दाखवूनही बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्यांना आत जाण्यापासून मज्जाव केला. कव्हरेजसाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या आणि मंडळाचे पास खिशात असूनही पोलिसांकडून अचानक मिळालेल्या या वागणुकीमुळे माध्यम प्रतिनिधींमध्ये प्रचंड संताप व नाराजी पसरली. "जर अधिकृत पासेस पाशी आहेत, तर मग वार्तांकन करण्यापासून का रोखले जात आहे ?" असा थेट सवाल पत्रकारांनी या प्रसंगी उपस्थित केला.
मुंबई : गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर भारतातील अमेरिकेचे राजदूत (Ambassador of the United States of America ) सर्जिओ गोर (Sergio Gor) यांनी मुंबईतील प्रसिद्ध 'लालबागच्या राजा'च्या (Lalbuagcha Raja ...
माध्यम प्रतिनिधी आक्रमक; पोलिसांशी साधला थेट संवाद
या अनपेक्षित प्रकारानंतर सर्व माध्यम प्रतिनिधी एकत्र आले आणि त्यांनी थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधत आपले म्हणणे मांडले. पोलिसांच्या अशा अवाजवी अडवणुकीमुळे प्रसारमाध्यमांच्या थेट प्रक्षेपणात आणि बातम्या पोहोचवण्याच्या कामात मोठा व्यत्यय येत असल्याचे प्रतिनिधींनी स्पष्ट केले. पोलिसांनी त्वरित या समस्येचे निरसन करून पत्रकारांना सुरळीत काम करू द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सुरक्षा व्यवस्था आणि गर्दीचे नियोजन आवश्यक असले, तरी बातमीदारांशी समन्वय राखणे गरजेचे आहे, अशी भावना या घटनेनंतर व्यक्त होत आहे.





