Monday, September 28, 2026

मालेगाव तालुक्यात खळबळ! आठवडे बाजारात भेळ भत्ता खाल्ल्याने तब्बल 140 जणांना विषबाधा; प्रशासनाचे चौकशीचे आदेश

मालेगाव तालुक्यात खळबळ! आठवडे बाजारात भेळ भत्ता खाल्ल्याने तब्बल 140 जणांना विषबाधा; प्रशासनाचे चौकशीचे आदेश

मालेगाव : जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथे भरलेल्या आठवडे बाजारात विक्रीस असलेल्या भेळ भत्त्यातून तब्बल 140 जणांना विषबाधा (Food Poisoning) झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. विषबाधा झालेल्या नागरिकांमध्ये लहान मुलांची संख्या लक्षणीय असून, नांदगाव बुद्रुकसह चिंचावड, गुंजाळवाडी आणि डोंगरगाव येथील ग्रामस्थांचा यामध्ये समावेश आहे. सुदैवाने, वेळेवर वैद्यकीय मदत मिळाल्यामुळे सर्व रुग्णांची प्रकृती आता स्थिर असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.

भेळ खाल्ल्यानंतर जुलाब, उलटी आणि ताप

नांदगाव बुद्रुक येथील साप्ताहिक बाजारात परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. बाजारातील एका स्थानिक दुकानदाराकडून खरेदी केलेला भेळ भत्ता खाल्ल्यानंतर काही वेळातच नागरिकांना तीव्र मळमळ, पोटदुखी, उलट्या, जुलाब आणि तापाचा त्रास सुरू झाला. एका पाठोपाठ अनेक नागरिकांना, विशेषतः लहान मुलांना त्रास होऊ लागल्याने परिसरात एकच घबराट पसरली. ग्रामस्थांनी तातडीने रुग्णवाहिका आणि खासगी वाहनांच्या मदतीने सर्व बाधितांना मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले.(malegaon food poisoning)

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

खासगी डॉक्टरांची मदतीसाठी धाव

सरकारी रुग्णालयात एकाच वेळी 140 हून अधिक रुग्ण दाखल झाल्याने सुरुवातीला मोठी धावपळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच मालेगाव शहरातील अनेक खासगी डॉक्टरांनी सामाजिक भान जपत थेट सरकारी रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी सरकारी डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून रुग्णांवर तातडीने उपचार सुरू केले. रुग्णांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. मोमीन यांनी सांगितले की, रुग्णालयात दाखल झालेल्या सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असून कोणीही धोक्यात नाही. वैद्यकीय पथक सर्व रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

मंत्र्यांकडून रुग्णांची भेट आणि चौकशीचे निर्देश

घटनेची माहिती मिळताच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तातडीने मालेगाव सामान्य रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची आवर्जून विचारपूस करून त्यांना धीर दिला. तसेच उपस्थित आरोग्य यंत्रणेला रुग्णांवर आवश्यक ते सर्व सर्वोत्तम वैद्यकीय उपचार करण्याचे कडक निर्देश दिले.(malegaon food poisoning)

नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन करत मंत्री भुसे यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) संबंधित विक्रेत्याच्या अन्नपदार्थांचे नमुने घेऊन तपासणी केली जाणार असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्नपदार्थ खरेदी करताना नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >