Friday, October 2, 2026

BMC : मुंबईत तब्बल ३४ टक्के पाण्याची गळती, चोरी

BMC : मुंबईत तब्बल ३४ टक्के पाण्याची गळती, चोरी

महापालिका प्रशासनाच्यावतीने आता प्राधान्याने यासाठी घेतली जाणार मोहिम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या माध्यमातून गारगाई पाणी प्रकल्पासह समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येत असले तरी सध्या मुंबईत गळती आणि चोरीच्या माध्यमातून तब्बल ३४ टक्के पाणी वाया जात असल्याची माहिती खुद्द प्रशासनाच्यावतीने देण्यता आली आहे. त्यामुळे १५ ते २० वर्षांपूर्वी जिथे २३ ते २७ टक्के एवढे पाणी हे गळती व चोरीच्या माध्यमातून वाया जात होते, तिथे आता हे प्रमाण ३४ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे गळती व चोरीच्या माध्यमातून वाया जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी करण्याऐवजी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अधिक वाढल्याचे दिसून येत आहे.

मुंबई महापालिका सभागृहामध्ये पाण्याबाबतचे सादरीकरण करताना अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी विना महसूल पाण्याचे प्रमाण हे म्हणजे नॉन रेव्हेन्यू वॉटर एनआरडब्ल्यूचे प्रमाण हे ३४ टक्के एवढे आहे. यामध्ये अनधिकृत वापर, मीटरमधील त्रुटी आणि गळती आदींचा समावेश आहे. मुंबईतील पाणी चोरी व गळतीची समस्या मागील अनेक वर्षांपासूनची असून धरणाचे बांधकाम करण्याऐवजी गळती व चोरीचे प्रमाण कमी केल्यास मुंबईतील पाणी साठा वाढवण्यास मदत होईल. परंतु, २३ ते २७ टक्क्यांमध्ये असलेली ही गळती व चोरी आता ३४ टक्क्यांवर जावून पोहोचल्याची आकडेवारीच खुद्द प्रशासनाने दिली आहे.

मुंबईमध्ये मोठ्याप्रमाणात अनधिकृत जलजोडण्याद्वारे तसेच इतर माध्यमातून पाण्याची चोरी केली जाते तसेच अनेक ठिकाणी पाण्याची गळती होते. त्यामुळे पाण्याची अनधिकृत जलजोडण्या शोधून त्या खंडित करणे आणि गळतीच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करून या पाण्याचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न राहणार आहे. यामुळे वाया जाणारे पाणी मुंबईकरांना मिळू शकेल आणि पर्यायाने महापालिकेच्या तिजोरीत पाण्याचे पैसे जमा होतील,असेही त्यांनी सांगितले.

या सादरीकरणामध्ये नगरसेवकांच्यावतीने सूचना करण्यात आल्या. यामध्ये सभागृह नेते गणेश खणकर यांनी विहार आणि तुळशीमधील गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करावा. तसेच टँकरसाठी विहिरींचे पाणी द्यावे, पण कुपनलिकांचे पाणी दिले जावू नये किंवा त्यांना अशाप्रकारच्या कुपनलिका खोदण्यास परवानगीसुध्दा दिली जावू नये अशी सूचना केली. परिमंडळ निहाय पाण्याचे नियोजन कशाप्रकारे केले जाणार याची माहिती डॉ सईदा खान यांनी विचारली, तर प्रकाश दरेकर यांनी विहिरी स्वच्छ करून त्याचे पाणी जास्तीत जास्त वापरात आणावे अशी सूचना केली. तर एसआरएच्या प्रकल्पामध्ये झोपड‌या तोडून टाकल्यानंतर तेथील जलवाहिन्या खंडित केल्या जात नाही. त्या जलवाहिनी तशाच राहून त्यातील पाणी वाया जाते. पण तेथील जलवाहिनी खंडित केली जात नाही. याप्रकरणी विकासकांवर कारवाई का केली जात नाही. अशाप्रकारे झोपड्या पाडल्यानंतर तेथील जलवाहिनी खंडित केल्या जाव्यात जेणेकरून तेथील पाणी वाया जाणार नाही आणि लोकांना त्या पाण्याचा उपयोग करता येईल,असे भाजप नगरसेविका प्रिती सातम यांनी अंधेरीतील प्रकरणाचा दाखला देत सांगितले.

नव्याने बनवलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या रस्त्याखाली गळती असल्यास ती कशी दूर करता येईल अशी विचारणा अश्रफ आझमी यांनी केली. तर पुन्हा मुंबईत प्रिपेड वॉटर मीटर लावले जावेत अशी सूचना यशोधर फणसे यांनी केले. जलअभिंयता विभागात अभियंत्यांसह कामगारांचीही भरती करा अशी मागणी शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी केली तर पंचतारांकित हॉटेलने पाण्याचे बिल न भरल्यास त्यांची जलवाहिनी खंडित करण्याची मागणी काँग्रेसच्या तुलिफ मिरांडा यांनी केली. तर जुन्या जलवाहिनींची दुरुस्तीचे प्रमाण कमी असून हे वाढवण्याचा प्रयत्न मागील तीन वर्षांत का झाला नाही असा शीतल गंभीर यांनी सवाल केला. तर उबाठाच्या श्रध्दा जाधव यांनी शिवडीत बारादेवी शाळेजवळ जिवंत झरा असून त्याचा वापर करण्यात यावा तसेच शिवडी जलाशयाजवळ गळती असून ती अद्यापही दुरुस्त केली जात नसल्याची तक्रार केली.

गळती दिसून आल्यानंतर हा रस्ता आपला कि अन्य कुणाचा यातच दुर्लक्ष केले जाते असे सांगत गळती दिसेल तिथे तात्काळ काम हाती घेतले जावे अशी सूचना केली. तर भाजपचे तेजिंदर सिंग तिवाना यांनी गळतीतून वाया जाणारे पाणी नाशिक शहराला पुरवठा होते ऐवढे असून गळती व चोरी रोखण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवला जावा अशी सूचना केली. तसेच रेन वॉटर हार्वेस्टींग कार्यान्वित आहे की नाही याची पुन्हा एकदा मोहिम राबवली जावी अशी सूचना केली. तर मुंबईत कार वॉशिंगसाठीही स्वतंत्र धोरण बनवले जावेत अशी सूचना करत एल आणि एन वॉर्डात पाणी वितरणाबाबत वाद आहे तो मिटवला जावा अशाप्रकारे पाण्याचे नियोजन करावे अशी सूचना हरिष भांदिर्गे यांनी केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >