Tuesday, October 13, 2026

नालासोपाऱ्यात खळबळ! नवरात्रोत्सवाच्या वादात आरोपीच्या मोबाईलमध्ये सापडले 150 हून अधिक अश्लील व्हिडिओ; तरुणीची तक्रार दाखल

नालासोपाऱ्यात नवरात्रोत्सवादरम्यान झालेल्या वादाने आता गंभीर वळण घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात एका तरुणीने तक्रार दाखल केली असून, आरोपीच्या मोबाईलमध्ये 150 हून अधिक अश्लील व्हिडिओ सापडल्याचा दावा केला जात आहे.

वसई-विरार : महाराष्ट्रातील नालासोपाऱ्यातून एक अत्यंत संतापजनक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. नवरात्रोत्सवादरम्यान गरबा खेळायला येणाऱ्या महिलांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी आधीच अटकेत असलेल्या आरिफ अयुब शेख याच्या प्रकरणाला आता मोठे आणि गंभीर वळण लागले आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये तब्बल 150 हून अधिक अश्लील व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आला असून, 12 ऑक्टोबर रोजी एका तरुणीने त्याच्याविरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात अत्याचाराची अधिकृत तक्रार दाखल केली आहे.

नेमकी घटना काय?

9 ऑक्टोबर रोजी नालासोपारा पश्चिममधील छेदनगर येथील वेबकॉर्न जिममध्ये व्यायाम करणाऱ्या काही तरुणांसमोर, आरिफ शेखने नवरात्रीत गरबा करण्यासाठी येणाऱ्या महिलांविषयी अत्यंत अपमानास्पद आणि अश्लील टिप्पणी केली होती. या प्रकारानंतर संतापलेल्या स्थानिकांनी आणि नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला. सुरुवातीला जेव्हा त्याचा मोबाईल तपासला गेला, तेव्हा त्यात 30 हून अधिक अश्लील व्हिडिओ आणि आक्षेपार्ह साहित्य सापडले होते. परंतु, आता तपासादरम्यान हा आकडा 150 हून अधिक व्हिडिओंपर्यंत पोहोचल्याचा दावा केला जात आहे.

परदेशी पॉर्न वेबसाइट्सवर व्हिडिओ पाठवून कमाईचा संशय

या प्रकरणावर तीव्र आक्रमक भूमिका घेत विश्व हिंदू महासंघ, मुंबईचे प्रभारी प्रदीप मिश्रा यांनी गंभीर आरोप केले आहेत. आरोपीने काही तरुणींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. तसेच, हे आक्षेपार्ह व्हिडिओ परदेशी पॉर्नोग्राफिक (अश्लील) वेबसाइट्सवर पाठवून त्यातून आर्थिक कमाई केली जात होती, असा खळबजनक दावाही मिश्रा यांनी केला आहे.

तपासात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह आणि पुराव्यांशी छेडछाड

या संपूर्ण प्रकरणाला राजकीय आणि प्रशासकीय वळणही लागले आहे. प्रदीप मिश्रा यांनी आरोप केला की, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रात्री 10 वाजेपासून सकाळीपर्यंत वारंवार पाठपुरावा करूनही पोलिसांनी तातडीने एफआयआर नोंदवली नाही. तसेच, पहाटेच्या सुमारास अहमद मेमन नावाचा व्यक्ती घटनास्थळी आला आणि त्याने आरोपी आरिफ शेखला तिथून नेले. एवढेच नव्हे तर, पोलिसांनी जप्त केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या मोबाईल फोनमधील महत्त्वाचे डिजिटल पुरावे नंतर जाणीवपूर्वक हटवण्यात (Delete) आले, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

विशेष तपास पथकामार्फत (SIT) चौकशीची मागणी

12 ऑक्टोबर रोजी एका पीडित तरुणीने धजावून पुढे येत आरिफ शेखविरोधात अत्याचाराची फिर्याद नोंदवली. या गंभीर गुन्ह्यानंतर पोलीस सध्या या प्रकरणाची कागदपत्रे आणि अधिकृत तपशील माध्यमांसमोर उघड करण्यास टाळाटाळ करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, मोबाईलमधील डिलीट केलेल्या पुराव्यांची फॉरेन्सिक छाननी करावी आणि या प्रकरणात पाठीशी घालणाऱ्या अथवा कथितरित्या सामील असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करत विशेष तपास पथकामार्फत (SIT) तपास करावा, अशी ठाम मागणी विश्व हिंदू महासंघाकडून करण्यात आली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >