Sunday, November 29, 2026

मुंबईत ५१ दिवसांमध्ये १६,१५३ बॅनरांची फाडाफाडी

तरीही चौकाचौकांना बॅनरबाजीने वेढले, कारवाई प्रत्यक्षात होते की आकड्यांमध्ये दिसते

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या बॅनरबाजांवर महापालिकेच्यावतीने कारवाई केली जात असून मागील ५१ दिवसांमध्ये तब्बल १६,१५३ अनधिकृत बॅनर फलकांवर कारवाई करत त्यांची फाडाफाडी केली. महापालिकेच्या परवाना विभागाचीच आकडेवारी नुसार ८ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर २०२६ या काळात पालिकेने १६,१५३ बॅनर, फलक, पोस्टर, झेंडे आणि भिंतीवरील विद्रूपीकरण हटवले असल्याचा दावा महापालिका परवाना विभागाने केला आहे. मात्र एवढ्या मोठ्या उल्लंघनानंतर पोलिसांकडे पत्रे गेली फक्त १४७, आणि प्रत्यक्ष एफआयआर दाखल झाले अवघे १७. त्यामुळे ही कारवाई आकडेवारीत दिसून येत असली तरी प्रत्यक्षात चौक आणि रस्त्यारस्त्यांना बॅनरबाजीने वेढल्याचे चित्र दिसूनयेत आहे. मग नक्की ही कारवाई प्रत्यक्षात होते की आकड्यांसाठीच होते असा प्रश्न निर्माण होत आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी रस्ते आणि चौक हे धार्मिक,सामाजिक आणि राजकीय बॅनरांनी व्यापून टाकले आहे. त्यामुळे मुंबईला विद्रुप करणाऱ्या बॅनरबाजीला लगाम घालण्यासाठी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी पुढाकार घेत मुंबईत एकही बॅनर,फलक राहताकामा नये अशाप्रकारचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यामुळे गणपतीनंतर सुरु झालेल्या कारवाईला व्यापक स्वरुप प्राप्त झाले आहे. परंतु महापौरांच्या आवाहनानंतरही मुंबईत बॅनर आणि फलक लावण्याचे प्रमाण कमी झालेले नाही, उलट भाजपसह सर्वच पक्षांचे लोक बिनधास्तपणे बॅनर लावत आहेत.

धार्मिक,सामाजिक आणि राजकीय पक्षांच्यावतीने लावलेले फलक सर्वाधिक आहेत, यात एकूण ९,१०७. राजकीय फलक ४,९४७ आहेत, तर व्यावसायिक आहे १,८४४. म्हणजे कारवाईत करण्यात आलेल्या प्रत्येक १०० अनधिकृत फलकांपैकी जवळपास ५७ धार्मिक तथा सामाजिक आणि ३१ राजकीय बॅनर होते. त्यामुळे "शुभेच्छा" आणि "अभिनंदना"च्या नावाखाली शहराला विद्रप करण्याचे काम सुरु आहे.

एका दिवसात हटवले १,७५६ फलक

मागील २१ ऑक्टोबर रोजी झाली. त्या एका दिवसात १,७५६ फलक हटवले गेले. त्यात ६६५ धार्मिक तथा सामाजिक बॅनर, २५१ राजकीय बॅनर, २११ राजकीय फलक आणि ५० झेंडे होते. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेन २२ ऑक्टोबर रोजी १,३२१ आणि २३ ऑक्टोबरला ९३० फलक काढले गेले. म्हणजे अवघ्या तीन दिवसांत ४,००७ फलक निघाले. यावरून महापौरांनी आवाज देताच पालिकेची यंत्रणा जागी झाली आणि एरवी मात्र ती झोपलेली असते, हे दिसून आले. कारवाई प्रत्येक दिवशी का नाही

परवाना विभागाच्या आकडेवारी नुसार ऑक्टोबर महिन्यातील ११, १७, १८, २४, २५ रोजी तसेच नोव्हेंबर महिन्यातील ७ ते ११ तसेच १५, २१, २२ आणि २४ नोव्हेंबर रोजी कारवाई करण्यातच आलेली नाही.०८ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर २०२६ची बॅनरवरील कारवाईची आकडेवारी

-बॅनर: एकूण १०,२५० (राजकीय २,८४५, व्यावसायिक १,३७२, धार्मिक/सामाजिक ६,०३३)

-फलक (बोर्ड): एकूण ४,९३२ (राजकीय १,९४५, व्यावसायिक ४५०, धार्मिक/सामाजिक २,५३७)

- पोस्टर: एकूण ७१६ (राजकीय १५७, व्यावसायिक २२, धार्मिक/सामाजिक ५३७)

- झेंडे: २३७

- भिंतींचे विद्रूपीकरण: १८

- पोलिसांना पत्रे: १४७

- प्रत्यक्ष गुन्हे (एफआयआर/प्रॉसिक्युशन): १७

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >