लोणावळा : जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी, २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत एका कारचा ताबा सुटून ती रस्त्याच्या कडेला असलेल्या रेलिंगला धडकली आणि त्यानंतर रस्त्यालगतच्या खोलगट भागात उलटली. या दुर्घटनेत कारमधील दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर चालक गंभीर जखमी झाला आहे. मृतांची नावे हुसेन शब्बीर गोधरावाला (२७, कोंढवा, पुणे) आणि आसीर इनामदार (२६, नेहरूनगर, पिंपरी) अशी आहेत. कार चालवणारा त्यांचा मित्र अनिकेत बरवा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिघेही एका खासगी कंपनीत काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास हे तिघे लोणावळ्याच्या दिशेने जात होते. त्यांच्यासोबत आणखी काही मित्र दोन कारमधून प्रवास करत होते. वाकसई गावाच्या हद्दीत पोहोचल्यावर चालक अनिकेतचा कारवरील ताबा सुटला. कारने महामार्गावरील रेलिंगला धडक दिली आणि त्यानंतर ती रस्त्याबाहेर जाऊन खोलगट भागात उलटली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. जखमी चालकासह तिघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी हुसेन आणि आसीर यांना मृत घोषित केले. या अपघातामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली.
दरम्यान, या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू असून वाहनाचा वेग, चालकाचा ताबा नेमका कसा सुटला आणि अपघाताच्या इतर कारणांचा तपास केला जात आहे. पहाटेच्या वेळी वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याचे महत्त्व या दुर्घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे.






