Saturday, September 5, 2026

Nashik : सृष्टीच्या मृत्यूनंतर प्रशासन खडबडून जागं, कळवणच्या आश्रमशाळांतील २४ विद्यार्थी एकाच दिवशी रुग्णालयात दाखल

Nashik : सृष्टीच्या मृत्यूनंतर प्रशासन खडबडून जागं, कळवणच्या आश्रमशाळांतील २४ विद्यार्थी एकाच दिवशी रुग्णालयात दाखल

Nashik : नाशिकच्या कळवण तालुक्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विविध आश्रमशाळांमधील तब्येत बिघडलेल्या तब्बल २४ विद्यार्थ्यांना एकाच दिवशी कळवण उपजिल्हा रुग्णालयात (Kalwan Sub-District Hospital) दाखल करण्यात आलं आहे. या विद्यार्थ्यांना ताप, सर्दी, खोकला तसंच संसर्गजन्य आजारांसारखी लक्षणं आढळून आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. (Nashik Kalwan News)

पाच आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचा समावेश

रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये निवाणे, विसापूर, मानूर, मोहनदरी आणि नाकोडे येथील आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये इयत्ता पहिलीपासून नववीपर्यंतच्या मुला-मुलींचा समावेश आहे. एकाच वेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्याने रुग्णालय परिसरातही काही काळ गर्दीचं वातावरण पाहायला मिळालं. (Nashik Kalwan News)

सृष्टीच्या मृत्यूनंतर प्रशासन खडबडून जागं

दरम्यान, शुक्रवारी सकाळी विसापूर आश्रमशाळेतील (Visapur Ashram School) आठ वर्षीय सृष्टी सूर्यवंशी या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्यानंतर आदिवासी विकास प्रशासनाकडून आश्रमशाळांमधील आरोग्य व्यवस्थेकडे अधिक गांभीर्याने पाहिलं जात आहे. सृष्टीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत सध्या अंतिम निष्कर्ष समोर आलेला नाही. प्राथमिक अंदाजानुसार तापामुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र, शवविच्छेदन आणि अंतिम वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. (Nashik Kalwan News)

विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचा मुद्दा चर्चेत

सृष्टीच्या मृत्यूनंतर आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी केली जाते का ? आजारी विद्यार्थ्यांकडे वेळेत लक्ष दिलं जातं का? आणि गरज भासल्यास त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं जातं का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आदिवासी भागातील आश्रमशाळांमध्ये अनेक विद्यार्थी निवासी स्वरूपात शिक्षण घेतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी, आजारी विद्यार्थ्यांसाठी योग्य व्यवस्था आणि आवश्यकतेनुसार तातडीने वैद्यकीय उपचार मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी ताप, सर्दी, खोकला किंवा संसर्गजन्य आजारांची लक्षणं आढळल्यास संबंधित विद्यार्थ्यांची तातडीने वैद्यकीय तपासणी करून आवश्यक उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांनंतर विविध आश्रमशाळांमधील आजारी विद्यार्थ्यांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं. प्राथमिक माहितीनुसार, दिवसभरात एकूण २४ विद्यार्थी उपचारासाठी दाखल झालेत. (Nashik Kalwan News)

पालकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही

दरम्यान, कळवण उपजिल्हा रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. जनक पूरकर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांना सर्दी, ताप आणि खोकल्याच्या तक्रारी आहेत. हे आजार हवेतून पसरणारे असून पावसाळ्यात अशा प्रकारचे आजार सहज होऊ शकतात. सर्व विद्यार्थी सध्या सुस्थितीत असून पालकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच परिसरात एखादा वेगळा किंवा गंभीर आजार पसरला असल्याची भीती बाळगू नये, असंही डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >