धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथील ऐतिहासिक उपळी बुर्जावरून तीन मुलांसह दरीत उडी मारलेल्या राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ आत्महत्या (Wrestler Ashwini Paul Death) प्रकरणात आता सर्व चार जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देणाऱ्या वीरा पौळ या अडीच वर्षांच्या बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यापूर्वीच या घटनेत अश्विनी पौळ, मुलगा अजिंक्य आणि मुलगी क्रांती यांचा मृत्यू झाला होता. आता वीराच्या मृत्यूनंतर या दुर्दैवी घटनेतील सर्व चारही जणांचा अंत झाला आहे. ( Naldurg Fort)
सासरच्या मंडळीकडून छळ
मिळालेल्या माहितीनुसार, 2007 ते 2009 दरम्यान राष्ट्रीय पातळीवर 5 सुवर्ण आणि 6 रौप्य पदके पटकावणाऱ्या अश्विनी पौळ यांनी पती आणि सासरच्या मंडळींच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या वडिलांनी केला आहे. घटनेच्या दिवशी त्या मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावर पोहोचल्या होत्या. किल्ल्याबाहेर त्यांनी मुलांचा केक कापला आणि दुकानातून चॉकलेट खरेदी केले. यानंतर उपळी बुर्जावरून त्यांनी तिन्ही मुलांना खाली फेकून स्वतःही 100 फूट खोल दरीत उडी मारली.
पोलिसांकडून कारवाई सुरु
या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत अश्विनी यांचे पती मनोहर पौळ आणि सासरे अंकुश पौळ यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 9 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.






