Monday, September 7, 2026

Nitin Gadkari : "नागपुरातील ९९% अंडरवर्ल्ड माझे समर्थक, पण..." केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खळबळजनक विधान

Nitin Gadkari :

नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) पल्या रोखठोक आणि थेट वक्तव्यांसाठी ओळखले जातात. नागपूरमध्ये आयोजित 'मिडिया कॉन्क्लेव्ह २०२६' (Media Conclave 2026) या कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्वतःच्या मतदार संघातील मतदानाच्या आकडेवारीवर आणि पाठींब्यावर एक अत्यंत खळबळजनक विधान केले आहे. "मी माझ्या विचारांशी ठाम आहे, पण नागपुरातील ९९ टक्के अंडरवर्ल्ड आणि गुन्हेगारी जगतातील लोक माझे समर्थक आहेत; मात्र याचा अर्थ असा मुळीच होत नाही की मी त्यांच्या अवैध कामांना पाठिंबा देतो," असे गडकरी म्हणाले.

.

सुशिक्षित आणि गुन्हेगारी भागातील मतदानात मोठा फरक

आपल्या निवडणूक निकालांचे विश्लेषण करताना नितीन गडकरी यांनी मतदानामधील फरक स्पष्ट केला. ते म्हणाले की, नागपूरमधील सुशिक्षित आणि श्रीमंत वस्त्यांमध्ये त्यांना साधारण ७० ते ७५ टक्के मते मिळाली. मात्र, ज्या भागांची ओळख गुन्हेगारी क्षेत्र, अंडरवर्ल्ड किंवा 'रेड-लाईट एरिया' म्हणून आहे, तिथून त्यांना तब्बल ९२ टक्के मते मिळाली आहेत.

विकासाच्या कामांमुळे जनतेचा पाठिंबा

वेगवेगळ्या सामाजिक घटकांकडून मिळालेल्या या मोठ्या पाठिंब्याचे स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, हा पाठिंबा पक्षाच्या किंवा व्यक्तीच्या विचारांपेक्षा तिथल्या विकासकामांचा परिणाम आहे. "आम्ही कोणत्याही भेदभावाशिवाय नागपूरच्या प्रत्येक कोपऱ्यात रस्ते, पायाभूत सुविधा आणि सामाजिक सोयी-सुविधा पोहोचवल्या आहेत. लोकांनी आमच्या कामावर विश्वास ठेवून मतदान केले आहे. प्रत्येकाशी वैयक्तिक संबंध ठेवणे वेगळे आणि त्यांच्या चुकीच्या कामांचे समर्थन करणे वेगळे," असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

लोकशाहीतील मूल्यांशी तडजोड नाही

आपल्या विधानात पुढे बोलताना गडकरी यांनी लोकशाही मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. समाजातील सर्वच स्तरांतील लोकांशी संपर्क असला तरी लोकशाही आणि नैतिकतेशी कधीही तडजोड केली जाऊ शकत नाही, असे ते म्हणाले. समाजातील प्रत्येक घटकामध्ये, मग त्यांची पार्श्वभूमी कोणतीही असो, लोकशाहीबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि शिक्षण देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. गडकरी यांच्या या स्पष्टवक्तेपणामुळे सोशल मीडियावर आणि राजकीय क्षेत्रात सध्या याच विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >