मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवाची सुरुवातच अनोख्या योगाने होणार आहे! कारण तब्बल ३१ वर्षांनंतर हरतालिका आणि गणेश चतुर्थीचा दुर्मिळ योग एकाच दिवशी जुळून आला आहे. त्यामुळे महिलांसाठी महत्त्वाच्या असलेल्या हरतालिका पूजेची लगबग आणि लाडक्या गणरायाच्या स्वागताचा उत्साह यंदा एकाच दिवशी अनुभवायला मिळणार आहे. (Hartalika And Ganesh Chaturthi)
म्हणजेच, एका बाजूला हरतालिकेची पूजा, व्रत आणि सजावटीची तयारी… तर दुसऱ्या बाजूला बाप्पाच्या आगमनाची धामधूम! पण हरतालिका पूजा आणि गणपती स्थापना नेमकी कोणत्या वेळी करायची? शुभ मुहूर्त कोणता? या दुहेरी सणासाठी काय तयारी करायची, हे सगळंच सविस्तर जाणून घेऊया. (Hartalika And Ganesh Chaturthi)
बाप्पासाठी चॉकलेट मोदक पारंपरिक मोदकासोबत यंदा काहीतरी वेगळं करून पाहायचं असेल, तर चॉकलेट मोदक हा छान पर्याय आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत ...
हरतालिका पूजन का करतात ?
पौराणिक कथेनुसार, देवी पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. हिमालयराजांना मात्र पार्वतीचा विवाह भगवान विष्णूंशी व्हावा अशी इच्छा होती. त्यामुळे आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी पार्वतीने भाद्रपद शुक्ल तृतीयेच्या दिवशी नदीकाठच्या वाळूपासून शिवलिंग तयार केलं आणि त्याची मनोभावे पूजा केली. उपवास, जागरण आणि कठोर तपश्चर्या करत तिने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्याचा संकल्प केला. तिच्या अढळ भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी तिची इच्छा पूर्ण करण्याचं वरदान दिलं आणि पुढे त्यांचा विवाह झाला. याच कथेशी हरतालिका व्रताची परंपरा जोडली जाते.
‘हरतालिका’ या नावामागेही एक रंजक कथा आहे. पार्वतीला तिच्या इच्छेविरुद्ध विष्णूंशी विवाह करावा लागू नये, यासाठी तिच्या सखीने तिला जंगलात नेऊन लपवलं होतं. ‘हरण’ म्हणजे घेऊन जाणे आणि ‘आलिका’ म्हणजे सखी, त्यामुळे या व्रताला ‘हरतालिका’ असं नाव पडलं, अशी मान्यता आहे. आजही विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हे व्रत श्रद्धेने करतात, तर कुमारिका मनासारखा आणि योग्य जीवनसाथी मिळावा, यासाठी हरतालिकेचं व्रत करतात. त्यामुळे हे व्रत देवी पार्वतीच्या प्रेम, भक्ती आणि अढळ संकल्पशक्तीचं प्रतीक मानलं जातं. (Hartalika And Ganesh Chaturthi)
गणेशोत्सवात श्री गणेशाला दाखवला जाणारा सर्वात प्रिय नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक. बाप्पाच्या आगमनाला सुवासिक आणि मऊ उकडीचे मोदक बनवणे ही प्रत्येक ...
हरतालिका पूजा कधी करावी?
यंदा हरतालिका पूजन आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, म्हणजेच १४ सप्टेंबर २०२६ रोजी, सोमवारी येत आहेत. पंचांगानुसार हरतालिका तृतीया तिथी १४ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत असून त्यानंतर गणेश चतुर्थीची तिथी सुरू होते. त्यामुळे यंदा महिलांना सकाळी हरतालिका पूजन आणि त्यानंतर गणरायाच्या स्थापनेची तयारी करावी लागणार आहे. मुंबईसाठी हरतालिका पूजेचा सकाळचा मुहूर्त सकाळी ६:०५ ते ७:०६ असा दिला आहे. (Hartalika And Ganesh Chaturthi)
गणपतीची स्थापना कधी करावी?
यानंतर गणेश चतुर्थीची तिथी १४ सप्टेंबर रोजी सकाळी ७:०६ ते १५ सप्टेंबर रोजी सकाळी ७:४४ पर्यंत राहणार आहे. मुंबईत गणेशमूर्ती स्थापनेसाठी सकाळी ११:२० ते दुपारी १:४८ हा शुभ मुहूर्त आहे. त्यामुळे यंदाचा दिवस भक्तांसाठी विशेष ठरणार असून, हरतालिका पूजन आणि बाप्पाची स्थापना एकाच दिवशी करण्याचा दुर्मीळ योग आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या २०२६च्या सार्वजनिक सुट्टीच्या यादीतही गणेश चतुर्थीची तारीख १४ सप्टेंबर अशीच नमूद आहे.(Hartalika And Ganesh Chaturthi)