Saturday, September 12, 2026

Jalgaon Ganeshotsav : स्थापनेआधीच बाप्पाचं विसर्जन! ४७ हजारांची १२ फुटी गणेशमूर्ती वाटेतच दुभंगली; कार्यकर्त्यांचा मूर्तिकारावर आरोप

Jalgaon Ganeshotsav : स्थापनेआधीच बाप्पाचं विसर्जन! ४७ हजारांची १२ फुटी गणेशमूर्ती वाटेतच दुभंगली; कार्यकर्त्यांचा मूर्तिकारावर आरोप

जळगाव : गणेशोत्सवासाठी मोठ्या उत्साहात बऱ्हाणपूरहून जळगावकडे आणली जात असलेली तब्बल १२ फूट उंचीची गणेशमूर्ती वाटेतच दुभंगल्याने नवी पेठेतील जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. सुमारे ४७ हजार रुपये खर्च करून तयार करून घेतलेल्या या भव्य मूर्तीची गणेशोत्सवात स्थापना करण्याऐवजी विसर्जन करण्याची वेळ मंडळावर आली. (Jalgaon Ganeshotsav)

जय महाराष्ट्र मित्र मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवासाठी बऱ्हाणपूर येथील मूर्तिकाराकडून ही गणेशमूर्ती तयार करून घेतली होती. मूर्ती जळगावला आणताना ती पूर्णपणे झाकून ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रवासादरम्यान मूर्तीला तडे गेले आहेत किंवा ती दुभंगली आहे, याची माहिती कार्यकर्त्यांना तात्काळ मिळाली नाही. (Jalgaon Ganeshotsav)

गुरुवारी सायंकाळी मूर्तीवरील आवरण हटवल्यानंतर तिची दुभंगलेली अवस्था समोर आली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्थापनेसाठी आधीपासूनच जोरदार तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी मूर्तीचे नुकसान झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीसोबतच हळहळही व्यक्त करण्यात आली.

दुभंगलेली मूर्ती मंडपात स्थापन करणे शक्य नसल्याने मंडळाने तिचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत मेहरुण तलावात मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. (Jalgaon Ganeshotsav)

दरम्यान, मूर्ती पूर्णपणे सुकण्यापूर्वीच घाईघाईने ती मंडळाच्या ताब्यात देण्यात आल्याने मूर्ती दुभंगल्याचा आरोप मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मंडळाचे पदाधिकारी भूषण जोशी यांच्या म्हणण्यानुसार, मूर्तिकाराने पूर्ण रक्कम घेतल्यानंतरही मूर्ती व्यवस्थित तयार करून दिली नाही. ओली मूर्ती घाईघाईने जळगावला पाठवण्यात आल्याने हा प्रकार घडल्याचा त्यांचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली असून, चौकशी करून निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी मंडळाने केली आहे. (Jalgaon Ganeshotsav)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >