Saturday, September 12, 2026

Nashik : नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ३,८०८ खातेदार पात्र ; ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन

Nashik : नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ३,८०८ खातेदार पात्र ; ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन

Nashik : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कमाल दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ३ हजार ८०८ पात्र खातेदार शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली आहे. या शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण अर्थात ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी केले आहे.

पहिल्या टप्प्यात ३५ हजार ८९० शेतकरी पात्र

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत २३ हजार ७९८, तर राष्ट्रीयकृत बँकांमार्फत ४५ हजार ६१ अशा एकूण ६८ हजार ८५९ शेतकरी खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १८ हजार ४५३ आणि राष्ट्रीयकृत बँकांचे १७ हजार ४३७, अशा एकूण ३५ हजार ८९० पात्र खातेदारांची यादी प्राप्त झाली. यापैकी ११ सप्टेंबरपर्यंत ३२ हजार ३७५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. तर उर्वरित ३ हजार २६७ शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे. तर ११ सप्टेंबर रोजी प्राप्त झालेल्या दुसऱ्या यादीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १ हजार ३४३ आणि राष्ट्रीयकृत बँकांचे २ हजार ४६३, अशा एकूण ३ हजार ८०८ पात्र शेतकऱ्यांचा समावेश आहे. ही यादी संबंधित बँक शाखा, सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ई-केवायसी कुठे कराल ?

यादीतील पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी ३१ मार्च २०२६ रोजीची कर्जबाकी ग्राह्य धरली जाणार असून, त्यानंतरचे व्याज आणि इतर खर्च माफ करण्यात येणार आहेत. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आपली कर्ज थकबाकी तपासून नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा ई-सेवा केंद्रावर विनामूल्य आधार प्रमाणीकरण करून घ्यावे.

दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्यांनाही लाभ

राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँकांशी संबंधित काही शेतकऱ्यांची ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असली, तरी शासनाच्या ‘हेअर कट’ धोरणानुसार ही कर्जे निरंक करण्यात येणार आहेत. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित कर्ज खात्यावर जमा केली जाणार आहे.

तक्रारी असल्यास कुठे संपर्क साधाल ?

आधार क्रमांक, कर्ज रक्कम किंवा बँक खाते क्रमांकाबाबत तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित बँक शाखेशी किंवा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >