Saturday, September 12, 2026

Nashik E-bus : पर्यावरणपूरक ई-बसेसच्या रूपाने नवे पर्व ! ई-बसेसची नियमित सेवा मंगळवारपासून सुरू होणार

Nashik E-bus : पर्यावरणपूरक ई-बसेसच्या रूपाने नवे पर्व ! ई-बसेसची नियमित सेवा मंगळवारपासून सुरू होणार

Nashik E-bus : नाशिककरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्र शासनाच्या पीएम-ई बस सेवा योजनेंतर्गत नाशिक शहरासाठी दाखल झालेल्या ५० इलेक्ट्रिक बसेसपैकी पहिल्या ई-बसेसची नियमित सेवा १५ सप्टेंबरपासून दोन मार्गांवर सुरू होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी कोणतीही अतिरिक्त भाडेवाढ करण्यात आलेली नाही. विद्यमान बस भाडेदरानुसारच या बसेसमध्ये प्रवास करता येणार आहे. (Nashik News)

नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. (Nashik Municipal Transport Corporation) (सिटीलिंक)च्या या ई-बसेसचे उद्घाटन २८ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर ५० ई-बसेसची प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तपासणी व मंजुरी तसेच विविध तांत्रिक चाचण्या पूर्ण करण्यात आल्या. त्यामुळे आता या बसेस रस्त्यांवर धावण्यास सज्ज होणार आहे. नाशिककरांनी या ई-बसेस सेवेचा लाभ घ्यावा आणि सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देऊन स्वच्छ, सुंदर व हरित नाशिकच्या निर्मितीत सहभागी व्हावे, असे आवाहन सिटीलिंक प्रशासनाने केले आहे. (Nashik News)

'या' भागांतून बस धावणार

मार्ग क्रमांक १०२ : तपोवन टर्मिनस ते बारदान फाटा. या मार्गावर जुना आडगाव नाका, रविवार कारंजा, सीबीएस, राजीव गांधी भवन, एचपीटी महाविद्यालय, महात्मानगर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातपूर मनपा विभागीय कार्यालय, सातपूर कॉलनी आणि अशोकनगर या भागांतून बस धावणार आहे. (Nashik News)

मार्ग क्रमांक १०३ : तपोवन टर्मिनस ते सिम्बायोसिस महाविद्यालय. या मार्गावर जुना आडगाव नाका, सीबीएस, वेद मंदिर आणि पवननगर या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित ई-बसेस विविध मार्गांवर सुरू करण्यात येणार असून, नाशिक शहरातील अधिकाधिक भागांना या पर्यावरणपूरक वाहतूक सेवेचा लाभ मिळणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >