Sunday, September 13, 2026

Rajapur Accident : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या वाहनाचा राजापूरमध्ये भीषण अपघात; 10 जण जखमी

Rajapur Accident : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या वाहनाचा राजापूरमध्ये भीषण अपघात; 10 जण जखमी
रत्नागिरी : गणपती बाप्पाच्या आगमनासाठी मुंबईहून कोकणातील गावी निघालेल्या गणेशभक्तांच्या वाहनाला रविवारी सकाळी भीषण अपघात झाला. राजापूर तालुक्यातील हातिवले येथे अंकिता पॅलेससमोर फोर्स अर्बेनिया वाहनाचा अपघात झाला. या दुर्घटनेत 8 ते 10 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गच्या दिशेने हे वाहन निघाले होते. वाहनातून सुमारे 15 प्रवासी प्रवास करत होते. राजापूर तालुक्यातील हातिवले येथे आल्यानंतर वाहनाचा भीषण अपघात झाला. धडक एवढी जोरदार होती की वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अपघाताची तीव्रता लक्षात येत आहे.
या दुर्घटनेत वाहनातील 8 ते 10 प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्व प्रवासी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कुणकावळे येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली. त्यानंतर जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांकडून अपघाताचा पंचनामा करण्याचे काम सुरू असून, वाहनाचा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास केला जात आहे. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 14 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असल्याने मोठ्या संख्येने चाकरमानी मुंबई, पुणे आणि राज्यातील इतर शहरांतून कोकणात रवाना झाले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर गेल्या काही तासांपासून मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. इंदापूर आणि माणगाव परिसरात वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी उत्साहात कोकणाकडे निघालेल्या भाविकांच्या प्रवासाला या अपघातामुळे गालबोट लागले आहे. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी आणि वेगावर नियंत्रण ठेवावे, असे आवाहन केले जात आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >