Sunday, September 13, 2026

BMC Ganeshotsav : यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ८५ कृत्रिम तलावांत वाढ, गणेश भक्तांनी बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे; महापालिका प्रशासनाने केले आवाहन

BMC Ganeshotsav : यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ८५ कृत्रिम तलावांत वाढ, गणेश भक्तांनी बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे; महापालिका प्रशासनाने केले आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने यंदाच्या गणेशोत्सवामध्ये बाप्पांच्या मूर्ती विसर्जन समुद्रात करण्याऐवजी कृत्रिम तलावांमध्ये अधिकाधिक व्हावे याकरता यांची संख्या वाढवली आहे. यंदा तब्बल ८५ कृत्रिम तलावांची संख्या वाढवली गेली आहे. मागील गणेशोत्सवामध्ये फिरते आणि स्थिर अशाप्रकारे २९८ कृत्रिम तलावांची संख्या होती, जी आता वाढवून ३८५ केली गेली आहे. त्यामुळे यंदा मुंबईकरांना अधिकाधिक गणेश मूर्ती विसर्जनासाठी नैसर्गिक विसर्जन स्थळांऐवजी कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती विसर्जनासाठी सुविधा देतानाच घराजवळ भाविकांना हे उपलब्ध करून दिले जात आहे.(BMC Ganeshotsav)

मुंबई महापालिकेच्यावतीने सन २००७-०८मध्ये सर्व प्रथम तत्कालिन महापौर डॉ शुभा राऊळ यांच्या संकल्पनेतून १७ ठिकाणी कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करून दिली होती. दादर येथील महापौर निवासस्थानाच्या परिसरात त्यांनी कृत्रिम तलावाची सुविधा उपलब्ध करून देतानाच समुद्रात मूर्ती विसर्जनाऐवजी याठिकाणी विसर्जन करावे असे आवाहन करताना त्यांना पर्यावरणाचेही महत्व पटवू दिले होते. त्यानंतर कालांतराने प्रत्येक वर्षी कृत्रिम तलावांमध्ये वाढ होत गेले. परंतु कोविडमध्ये कृत्रिम तलावांतील मूर्ती विसर्जनाच्या संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ होवून मागील वर्षीपर्यंत २९८ एवढी यांची संख्या पोहोचली होती.

यंदा महापालिकेची निवडणूक होवून नगरसेवक निवडून आल्यानंतर आता त्यांनी काही तलावांची सुचना केल्यानंतर यामध्ये तब्बल ८५ कृत्रिम तलावांची संख्या वाढली गेली आहे. मागील वर्षी २९८ कृत्रिम तलावांमध्ये एकूण १ लाख ८८ हजार ३८७ मूर्तींचे विसर्जन पार पडले होते. यामध्ये सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींची संख्या ९ हजार ८५२ एवढी होती, तर घरगुती गणेश मूर्तींची संख्या १ लाख ७३ हजार ५६३ आणि ४ हजार ९७२ गौरी मूर्तींचा समावेश होता. सहा फुटांच्या आतील गणेश मूर्तींचे विसर्जन याठिकाणी केले जात असून मागील वर्षांपासून सहा फुटांपर्यंतच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करता येईल अशाप्रकारे कृत्रिम तलावांची निर्मिती महापालिकेच्या माध्यमातून केली जात आहे.

श्री गणेशोत्सव पर्यावरणपुरक पध्दतीने साजरा व्हावा, यासाठी कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी महापालिकेने संपूर्ण मुंबईत २७८ ठिकाणे मिळून ३८३हून अधिक कृत्रिम तलावांची उभारणी केली आहे. यातून पर्यावरणपुरक उत्सवाला हातभार लागणार आहे. नागरिकांनी कृत्रिम तलावात श्री गणेशमूर्ती विसर्जित कराव्यात असे आवाहन महापालिका प्रशासनाच्यावतीने परिमंडळ दोनचे उपायुक्त प्रशांत सपकाळे यांनी केले आहे.(BMC Ganeshotsav)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >