Sunday, September 13, 2026

Indonesia ship accident : इंडोनेशियातील जावा समुद्रात मोठा अपघात; बेपत्ता जहाजातील १०२ प्रवाशांची सुखरूप सुटका, एकाचा मृत्यू

Indonesia ship accident : इंडोनेशियातील जावा समुद्रात मोठा अपघात; बेपत्ता जहाजातील १०२ प्रवाशांची सुखरूप सुटका, एकाचा मृत्यू

जकार्ता: इंडोनेशियातील जावा समुद्रात रविवारी घडलेल्या एका धक्कादायक दुर्घटनेत २४० प्रवाशांना घेऊन जाणारे एक जहाज बेपत्ता झाले होते. या जहाजाचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवण्यात आली, ज्यामध्ये बचाव पथकाला मोठे यश मिळाले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १०२ प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली असून, या दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी पुष्टी करण्यात आली आहे.(Indonesia Java Sea accident)

तांत्रिक बिघाड आणि खराब हवामानामुळे संपर्क तुटला

मिळालेल्या माहितीनुसार, 'वर्गो ट्रान्सपोर्ट ८' (Virgo Trans Utama) नावाचे हे जहाज इंडोनेशियातील सुरबाया शहरातून बोर्निओ बेटावरील दक्षिण कालीमंतानच्या बंजारमासिन शहराकडे जात होते. प्रवासादरम्यान समुद्रात अचानक हवामान बिघडले आणि जहाजात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्याची संपर्क व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली. जहाजाचे शेवटचे लोकेशन बंजारमासिनच्या किनाऱ्यापासून सुमारे १४८ किलोमीटर अंतरावर जावा समुद्रात नोंदवले गेले होते. जहाजाच्या ऑपरेटरने संपर्क तुटल्याची माहिती मिळताच प्रशासनाला सतर्क केले.

उर्वरित प्रवाशांचा शोध सुरू

घटना समजताच दक्षिण कालीमंतान प्रांताच्या बंजारमासिन येथील शोध आणि बचाव कार्यालयाने तातडीने पावले उचलली. बचाव कर्मचाऱ्यांसह बचाव नौका तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. तसेच परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी त्रिशक्ती येथे एक विशेष 'ऑपरेशन्स पोस्ट' स्थापन करण्यात आले आहे. बंजारमासिन बचाव संस्थेचे ऑपरेशन्स प्रमुख अरियांतो अर्दी यांनी जहाजाशी संपर्क तुटल्याच्या वृत्ताची पुष्टी केली आहे.

सध्या स्थानिक बचाव पथके आणि प्रशासन समुद्रात वेगाने बचावकार्य करत असून, उर्वरित १३७ प्रवाशांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. समुद्रातील हवामानाचा सामना करत लवकरात लवकर सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढणे ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे.(Indonesia Java Sea accident)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >