Tuesday, September 15, 2026

Maharashtra Cabinet Meeting : राज्यातील दुष्काळजन्य स्थितीबाबत कॅबिनेट बैठकीत पाऊण तास चर्चा

Maharashtra Cabinet Meeting : राज्यातील दुष्काळजन्य स्थितीबाबत कॅबिनेट बैठकीत पाऊण तास चर्चा

- जिल्हानिहाय सादरीकरण; 'एनडीआरएफ'च्या सर्वेक्षणासाठी ५ ऑक्टोबरपर्यंत न थांबण्याचा निर्णय

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड ३० दिवसांपर्यंत लांबल्याने निर्माण झालेल्या दुष्काळजन्य स्थितीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत सुमारे पाऊण तास सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यातील पावसाची स्थिती, खंडाचा कालावधी आणि संभाव्य अडचणींचे जिल्हानिहाय सादरीकरण मंत्रिमंडळासमोर करण्यात आले. परिस्थितीवर सरकारचे बारकाईने लक्ष असून, टंचाई आणि दुष्काळाच्या उपाययोजनांची तयारी सुरू करण्यात आली आहे. कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (Maharashtra Cabinet Meeting)

मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी राज्यातील पावसाची परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगितले. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड ३० दिवसांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. पावसाचा खंड किती आहे, त्यातून कोणत्या अडचणी निर्माण होऊ शकतात, याची संपूर्ण माहिती बैठकीत घेण्यात आली. या पार्श्वभूमीवर टंचाई तसेच दुष्काळाच्या परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) निकषांनुसार सर्वेक्षण ५ ऑक्टोबरनंतर करावे लागते. त्यापूर्वी केलेले सर्वेक्षण मदतीसाठी पात्र ठरत नाही. मात्र, सरकार ५ ऑक्टोबरपर्यंत थांबणार नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्याआधीच परिस्थितीची प्राथमिक माहिती घेऊन आवश्यक उपाययोजनांची तयारी सुरू करण्यात आली आहे. (Maharashtra Cabinet Meeting)

५ ऑक्टोबरपासून होणारे सर्वेक्षणही पुढील आठ-दहा दिवसांत करण्याची तयारी करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. त्यासाठी संबंधित यंत्रणांना तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारची मदत आवश्यक आहे, याचाही विचार सुरू आहे. “कोणत्याही शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक असलेली संपूर्ण मदत देण्याची राज्य शासनाची तयारी असून, त्यासंदर्भातील आराखडा तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (Maharashtra Cabinet Meeting)

दिशा सालियन प्रकरणावर तर्कवितर्क नको

दिशा सालियन प्रकरणातील सीबीआयच्या एफआयआरबाबत बोलताना फडणवीस यांनी आपण अद्याप एफआयआर पाहिलेला नसल्याचे सांगितले. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले असून, सीबीआयने त्यासंदर्भात एफआयआर दाखल केला आहे. आता सीबीआय कोणत्या पद्धतीने चौकशी करते, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या प्रकरणावर आताच तर्कवितर्क करणे योग्य नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

‘बहुभाषिक’ म्हणजे मराठीविरोधी नव्हे

- महाराष्ट्र हे बहुभाषिक राज्य असल्याच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. अमित शाह यांचे संपूर्ण भाषण ऐकले असते तर कदाचित अशा प्रतिक्रिया आल्या नसत्या, असे ते म्हणाले. निवडक वक्तव्य ऐकून किंवा पाहून त्यावर प्रतिक्रिया देणे चुकीचे असल्याची टीका त्यांनी केली. - अमित शाह यांनी महाराष्ट्रातील मराठीचे महत्त्व, मराठीचा गौरव आणि मातृभाषेतच शिक्षण देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आग्रह आपल्या भाषणात स्पष्ट केला होता. त्याचबरोबर महाराष्ट्रातील लोक वेगवेगळ्या भाषा शिकतात, या अर्थाने त्यांनी महाराष्ट्राचा बहुभाषिक असा उल्लेख केला होता. बहुभाषिक असण्याचा अर्थ मातृभाषा वेगळी असणे असा होत नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. - “मी बहुभाषिक आहे; पण माझी मातृभाषा मराठी आहे. मला मराठीचा अभिमान आहे. त्यासोबत मला हिंदी आणि इंग्रजी बोलता येते. त्यामुळे मी बहुभाषिक होतो. याचा अर्थ मी मराठी नाही का? मी मराठीच आहे, मी मराठीच राहणार आहे. माझे मराठीपण कोणी हिरावून घेऊ शकत नाही,” असे फडणवीस म्हणाले. - महाराष्ट्र मराठीचा आहे आणि तो मराठीच राहणार आहे. मराठी कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. अमित शाह यांनी केलेल्या मराठीच्या गौरवाबाबतच्या वक्तव्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून त्यातील एका भागावरच टीका केली जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.(Maharashtra Cabinet Meeting)

प्रियंका गांधींना आधी जबाबदारी द्या!

काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल होण्याच्या चर्चेवर फडणवीस यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावरही टीका केली. प्रियंका गांधी या जवळपास १ हजार दिवसांपासून काँग्रेसच्या सरचिटणीस आहेत. मात्र, त्यांना अद्याप कोणताही विभाग, राज्य किंवा ठोस कामकाज देण्यात आलेले नाही, असा दावा त्यांनी केला. इतर राज्यांतील नेतृत्व बदलण्याचा विचार करण्यापूर्वी प्रियंका गांधी यांना काहीतरी जबाबदारी द्यावी. त्यांना नावापुरते सरचिटणीस ठेवू नये, असा टोला फडणवीस यांनी काँग्रेसला लगावला.(Maharashtra Cabinet Meeting)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >