Tuesday, September 15, 2026

Navnath Ban : आदित्य ठाकरे अडचणीत येताच संजय राऊत सुखावले; नवनाथ बन यांचा गंभीर आरोप

Navnath Ban : आदित्य ठाकरे अडचणीत येताच संजय राऊत सुखावले; नवनाथ बन यांचा गंभीर आरोप

मुंबई : दिशा सालियन प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दिशा सालियन प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानंतर आदित्य ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात राजकीय षडयंत्र असल्याचा दावा करणे योग्य नसल्याचे बन यांनी म्हटले. (Navnath Ban)

भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन म्हणाले की, दिशा सालियन यांचे वडील न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. त्यामुळे यामध्ये राजकीय षडयंत्र कुठे आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एकीकडे महायुती सरकारच्या काळात पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दिल्याचे संजय राऊत सांगतात आणि दुसरीकडे राजकीय षडयंत्रातून गुन्हा दाखल झाल्याचा आरोप करतात. जर राजकीय षडयंत्र असते, तर सरकारने क्लोजर रिपोर्ट दिला नसता, असा दावा बन यांनी केला. (Navnath Ban)

‘आदित्य ठाकरे दोषी नसतील तर घाबरण्याचे कारण काय?’

दिशा सालियन प्रकरणात कोणी दोषी नसेल तर चौकशीला घाबरण्याचे कारण काय, असा सवालही नवनाथ बन यांनी केला. चौकशीतून सत्य समोर येईल आणि ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल, असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही गंभीर आरोप केले. आदित्य ठाकरे अडचणीत आल्यामुळे संजय राऊत सर्वाधिक आनंदित असल्याचा दावा त्यांनी केला. चौकशीत आदित्य ठाकरे दोषी सिद्ध होऊन राजकीय पटलावरून बाजूला झाले, तर उद्धव ठाकरे गटावरील आपला प्रभाव वाढवता येईल आणि काँग्रेससोबत अधिक जवळीक साधता येईल, अशी राऊतांची इच्छा असल्याचा आरोप बन यांनी केला. (Navnath Ban)

‘ठाकरे कुटुंबाच्या वारशाला डाग लावण्याचे काम राऊतांकडून’

ठाकरे कुटुंबाच्या राजकीय आणि वैचारिक वारशाला कोणीही डाग लावण्याचा प्रयत्न करत नसल्याचे सांगत, उलट संजय राऊतच ठाकरे कुटुंबाचे स्थान डळमळीत करण्याचे काम करत असल्याची टीका बन यांनी केली. काँग्रेससोबत राजकीय आघाडी करून ठाकरे कुटुंबाच्या वैचारिक वारशाला डाग लावला, असा आरोपही त्यांनी केला. (Navnath Ban)

डीलिमिटेशनवरूनही राऊतांना लक्ष्य

मतदारसंघ पुनर्रचनेच्या म्हणजेच डीलिमिटेशनच्या मुद्द्यावरूनही नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. डीलिमिटेशनला राऊतांच्या पक्षाने पाठिंबा दिल्यानंतर त्यांच्या पक्षाचे किती खासदार वाढणार आहेत, असा सवाल त्यांनी केला.

‘तुमच्या नऊपैकी सहा खासदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत. उरलेले तीन खासदार एका रिक्षातून फिरतात,’ अशी बोचरी टीका करत राऊतांनी डीलिमिटेशन विधेयकाबाबत भविष्यवाणी करण्याच्या भानगडीत पडू नये, असे बन म्हणाले. डीलिमिटेशन विधेयकाला विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा असून, ते मंजूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सक्षम असल्याचा दावाही त्यांनी केला. (Navnath Ban)

राज ठाकरे यांच्या ट्विटवरूनही नवनाथ बन यांची टोलेबाजी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही’ या ट्विटवरूनही नवनाथ बन यांनी भाष्य केले. हे ट्विट अमित ठाकरे यांच्यासाठीच असल्याचे त्यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयातून त्यांचा फोटो हटविल्याने मोदींची प्रतिमा कमी होत नाही. देशातील जनता त्यांच्या पाठीशी असल्याचा दावा बन यांनी केला. (Navnath Ban)

पुण्यातील एका कार्यक्रमाच्या वेळीही राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांना पत्रकार परिषद घेऊ दिली नाही किंवा माध्यमांसमोर स्वतंत्र भूमिका मांडू दिली नाही, असा दावा बन यांनी केला. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नादी लागू नका’, असा सल्ला राज ठाकरे यांनी आधी अमित ठाकरे यांना घरात दिला आणि आता तोच संदेश सार्वजनिकपणे ट्विटच्या माध्यमातून दिल्याचे बन म्हणाले. (Navnath Ban)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता किंवा जनतेचा पाठिंबा केवळ टीका किंवा राजकीय वक्तव्यांमुळे कमी होणार नाही, असे सांगत नवनाथ बन यांनी राज ठाकरे आणि मनसेवरही निशाणा साधला. (Navnath Ban)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा