Tuesday, September 15, 2026

Kiran Gaikwad New Movie : ‘देवमाणूस’चा खतरनाक व्हिलन आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत; किरण गायकवाडच्या ‘F.I.R. NO. 469’चं पोस्टर लाँच

Kiran Gaikwad New Movie : ‘देवमाणूस’चा खतरनाक व्हिलन आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत; किरण गायकवाडच्या ‘F.I.R. NO. 469’चं पोस्टर लाँच

मुंबई : ‘किरण गायकवाड’ म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो ‘देवमाणूस’ मालिकेतील खतरनाक व्हिलन. मालिकेतील त्याच्या प्रभावी आणि क्रूर भूमिकेमुळे तो महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला. पडद्यावर त्याची भूमिका पाहून खऱ्या आयुष्यातही अनेक जण त्याला घाबरतात. मात्र, आता हाच लोकप्रिय अभिनेता एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. किरण गायकवाडने अभिनयासोबतच लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवले असून, त्याच्या पहिल्या चित्रपटाचं नाव ‘F.I.R. NO. 469’ आहे. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. (Kiran Gaikwad New Movie)

किरण गायकवाडला ‘लागीरं झालं जी’ या मालिकेतील भूमिकेमुळे टेलिव्हिजन विश्वात ओळख मिळाली. त्यानंतर ‘देवमाणूस’ ही मालिका त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरली. या मालिकेत त्याने डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंग ही नकारात्मक भूमिका साकारली. पात्राची क्रूरता, त्याचं वेगळं व्यक्तिमत्त्व आणि किरणचा दमदार अभिनय प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला. या भूमिकेमुळे किरण गायकवाड महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला.

यानंतर किरणने मालिकांसोबतच मराठी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली. ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘फकाट’, ‘चौक’ आणि ‘नाद’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारल्या. अभिनयाच्या पलीकडे जात आता त्याने लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे. (Kiran Gaikwad New Movie)

लेखनासोबत दिग्दर्शनाचीही जबाबदारी

किरण गायकवाडने दिग्दर्शित केलेला ‘F.I.R. NO. 469’ हा त्याचा पहिला चित्रपट आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचं लेखनही त्यानेच केलं आहे. चित्रपटात मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक ओळखीचे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. (Kiran Gaikwad New Movie)

या चित्रपटात अभिनेता नचिकेत पूर्णपात्रे, प्रसाद ओक, अमृता धोंगडे, राहुल मगदूम, निखिल चव्हाण, हार्दिक जोशी, अंकिता लांडे, देवेंद्र गायकवाड, रमेश परदेशी, सुहास शिरसाट, योगेश शिरसाट, चेतन चावडा, अंजली जोगळेकर, अंकुश मांडेकर, मीरा सारंग आणि चेतन रायकर यांच्या भूमिका आहेत. (Kiran Gaikwad New Movie)

एका ‘कॉमन मॅन’ची सस्पेन्स-थ्रिलर कहाणी

चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरनेही प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. पोस्टरमध्ये पोलीस स्टेशनमधील एका बाकावर बसलेला एक सर्वसामान्य माणूस दिसत असून, त्याच्या चेहऱ्यावरची हतबलता आणि मागील भिंतीवर लिहिलेलं ‘सत्यमेव जयते’ लक्ष वेधून घेतं. (Kiran Gaikwad New Movie)

‘F.I.R. NO. 469’ हा एका सर्वसामान्य नागरिकाच्या आयुष्याभोवती फिरणारा सस्पेन्स-थ्रिलर असल्याचं समोर आलं आहे. सत्ता, राजकारण, पैसा, गुन्हा, पोलीस प्रक्रिया आणि प्रशासनाच्या गुंत्यात अडकलेल्या एका सामान्य माणसाची कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. त्यामुळे चित्रपटाची कथा नेमकी कोणत्या दिशेने उलगडणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

चित्रपटाबद्दल बोलताना किरण गायकवाड म्हणतो, “एका कॉमन मॅनची गोष्ट ‘F.I.R. NO. 469’ या चित्रपटात आहे. अत्यंत नाट्यमय घटना-घडामोडींमधून ही गोष्ट उलगडत जाते. समाजातील वेगवेगळे पदर त्यातून समोर येतात. त्यामुळे प्रेक्षक या कथेत नक्कीच गुंततील, अशा पद्धतीने चित्रपटाची मांडणी करण्यात आली आहे.” (Kiran Gaikwad New Movie)

अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवल्यानंतर आता किरण गायकवाड दिग्दर्शक म्हणून किती प्रभाव पाडतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ‘F.I.R. NO. 469’ हा चित्रपट २२ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >