Nashik Crime News : नाशिकमध्ये गणेशोत्सवाच्या उत्साहाला गुन्हेगारी कृत्याने गालबोट लागलं आहे. गणपतीचा हप्ता दिला नाही, या कारणावरून शहरातून तडीपार असलेल्या संशयित गुन्हेगाराने साथीदारांसह गंगावाडी परिसरात धुडगूस घातल्याची घटना समोर आली आहे. चॉपर आणि चाकूसारखी धारदार शस्त्रे घेऊन आलेल्या संशयितांनी नागरिकांना धमकावत वाहनांची तोडफोड, दगडफेक आणि जबरी चोरी केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, तडीपार असलेला गुन्हेगार शहरात फिरत कसा होता ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पार्किंगच्या नावाखाली दरमहा २ हजारांचा हप्ता ?
ही घटना सोमवारी (१४ सप्टेंबर) रात्री सुमारे नऊ वाजता रविवार पेठेतील गंगावाडी परिसरात घडली. गणपती स्थापनेच्या उत्साहात नागरिक आणि मंडळाचे कार्यकर्ते परिसरात जमले होते. याचवेळी अवधूत जाधव, जयेश जाधव, राहुल दिघे आणि रोशन गांगुर्डे हे चौघे धारदार शस्त्रे घेऊन आल्याचा आरोप आहे. गल्लीत वाहनं पार्क करण्यासाठी दरमहा दोन हजार रुपयांचा हप्ता मागत त्यांनी नागरिकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर वाहनांची तोडफोड करण्यात आली. मंडळाने गणपतीचा हप्ता दिला नसल्याचा राग काढत या संशयितांनी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवरही हल्ला केल्याचा आरोप आहे.
Nashik Crime News : नाशिकच्या हनुमान नगर परिसरात किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या कौटुंबिक वादाचा अत्यंत गंभीर शेवट झाल्याची घटना समोर आली आहे. जेवणात पिठलं न ...
चॉपरचा धाक दाखवून पैसे हिसकावले
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, संशयित अवधूत जाधव याने चॉपरचा धाक दाखवत एका नागरिकाच्या खिशातून १ हजार २०० रुपये बळजबरीने काढून घेतले. तर जयेश जाधव आणि रोशन गांगुर्डे यांनी चाकूचा धाक दाखवत शुभम मेटकर या तरुणाकडून ५०० रुपये हिसकावल्याचा आरोप आहे. शुभमने प्रतिकार केल्यानंतर त्याला दगडाने मारहाण करून जखमी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. राहुल दिघे याने हप्ता दिला नाही तर कार्यक्रम करू देणार नाही, अशी धमकी देत नागरिकांवर दगडफेक केल्याचा आरोप आहे. या धुडगुसात एमएच १५ डीपी ०१७१ आणि एमएच १५ डीडी ६६६४ या दुचाकींसह इतर वाहनांचे नुकसान झाले. या तोडफोडीत सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
दोघांना अटक, इतरांचा शोध सुरू
स्थानिक व्यावसायिक विशाल चंद्रकांत आहेर यांच्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) चौघांविरोधात जबरी चोरी, खंडणी, प्राणघातक शस्त्रांचा वापर आणि तोडफोडीसह विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर डगळे तपास करत आहेत. पोलिसांनी अवधूत जाधव आणि राहुल दिघे या दोघांना अटक केली असून, उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे. दरम्यान, तडीपार असलेला संशयित शहरात कसा दाखल झाला आणि त्याच्यासोबत इतर कोणाचा सहभाग आहे का, याबाबतही पोलिसांकडून तपास केला जात आहे.