Thursday, September 17, 2026

Indian youth death abroad : अमेरिकेत हैदराबादच्या २८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू; मृतदेह भारतात आणण्यासाठी कुटुंबीयांची केंद्र सरकारकडे आर्त हाक

Indian youth death abroad : अमेरिकेत हैदराबादच्या २८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू; मृतदेह भारतात आणण्यासाठी कुटुंबीयांची केंद्र सरकारकडे आर्त हाक

चेन्नई: अमेरिकेतून एक अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे. हैदराबाद येथील रहिवासी असलेल्या आणि अमेरिकेत सिव्हिल इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेल्या मोहम्मद जाबेर हुसैन (२८ वर्षे) यांचा मॅसॅच्युसेट्समधील लोवेल येथील त्यांच्या घरी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, मोहम्मद जाबेर हुसैन यांचा विवाह अवघ्या १७ दिवसांपूर्वीच झाला होता, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर आणि परिसरात शोककळा पसरली आहे.(Indian youth death abroad)

अवघ्या १७ दिवसांपूर्वी झाला होता विवाह

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद जाबेर हुसैन यांचा विवाह २८ ऑगस्ट रोजी टेक्सास येथे पार पडला होता. विवाहानंतर ते मॅसॅच्युसेट्सला परतले, जिथे ते नोकरी करत होते. मात्र, त्यांची पत्नी त्यांच्यासोबत मॅसॅच्युसेट्सला परतली होती की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, हुसैन यांनी १४ सप्टेंबर रोजी आपल्या घरी शेवटचे संभाषण केले होते. या फोननंतर अवघ्या आठ तासांच्या आत त्यांच्या रूममेटने कुटुंबीयांना फोन करून हुसैन यांचा झोपेतच मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती दिली.(Indian youth death abroad)

घटनेनंतर हुसैन यांना तात्काळ कोणतीही वैद्यकीय मदत मिळाली होती का, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. सध्या त्यांचे कुटुंबीय शवविच्छेदन (Post-mortem) आणि अधिकृत वैद्यकीय अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. या अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूची नेमकी परिस्थिती आणि कारण समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिक्षणापासून ते अमेरिकेतील करिअरचा प्रवास

मोहम्मद जाबेर हुसैन हे उच्च शिक्षणासाठी २०२१ मध्ये अमेरिकेत गेले होते. त्यांनी कनेक्टिकट येथील 'युनिव्हर्सिटी ऑफ न्यू हेवन'मधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी (Master's) पूर्ण केली. २०२३ मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ‘एस्टिमेटर’ कंपनीत इंटर्नशिप केली. त्यानंतर त्यांनी ‘ग्रीन इंटरनॅशनल एफिलिएट्स इंक.’ या कंपनीत तीन वर्षांहून अधिक काळ सेवा दिली. अलीकडेच त्यांनी नोकरी बदलून मॅसॅच्युसेट्सस्थित ‘लोचनर’ या नामांकित कंपनीत सिव्हिल इंजिनिअर म्हणून काम सुरू केले होते. अत्यंत होतकरू तरुणाच्या अशा अचानक आणि गूढ मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत असून, मृतदेह लवकरात लवकर भारतात यावा, यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न सुरू आहेत.(Indian youth death abroad)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >