Kolhapur Kalamba Jail Attack : ‘तू लई नियमानं वागतोस, शांत राहा, नाहीतर बाहेर गेल्यावर तुला सोडणार नाही,’ अशी धमकी देत मोक्का प्रकरणातील कैद्यांनी थेट तुरुंग अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये घुसून हल्ला केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरातील कळंबा कारागृहात घडली आहे. सहा कैद्यांनी कार्यालयात घुसून अधिकाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी एका कैद्याने दगडाने डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला.
या हल्ल्यात वरिष्ठ तुरुंगाधिकारी प्रकाश फुन्नू चव्हाण (वय 50, रा. साळोखेनगर) जखमी झाले आहेत. याप्रकरणी अल्ताफ शरीफ, भारत राजू शेट्टी, विनायक संभाजी चौगुले, आशुतोष संतोष वर्तले, आदम मोहम्मद मुजावर आणि शाहीद मन्सूर यांच्याविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Kolhapur Kalamba Jail Attack)
दंगा करणाऱ्या कैद्यांना शिस्तीचे धडे
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश चव्हाण हे कळंबा कारागृहात वरिष्ठ तुरुंगाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 14 सप्टेंबर रोजी कारागृहातील सर्कल क्रमांक 1 मधील बॅरेक क्रमांक 3 आणि 4 मधील काही कैदी दंगा करत होते. मोठ्याने आरडाओरडा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर चव्हाण त्या ठिकाणी गेले. त्यांनी कैद्यांना दंगा न करण्यास तसेच कारागृहातील शिस्त मोडू नये, अशा सूचना दिल्या. मात्र, याच घटनेचा राग मनात धरून कैद्यांनी बुधवारी थेट अधिकाऱ्याच्या कार्यालयात प्रवेश केल्याचा आरोप आहे. (Kolhapur Kalamba Jail Attack)
Marathwada Special : १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला... पण भारताचा एक भाग असा होता, ज्याला स्वातंत्र्यासाठी आणखी १३ महिने संघर्ष करावा लागला. हा प्रदेश म्हणजे ...
सहा कैदी अचानक केबिनमध्ये घुसले
बुधवारी सकाळी सहा कैदी मंडल अधिकारी कार्यालयात घुसले. त्यांनी चव्हाण यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार आहे.दरम्यान, अल्ताफ शरीफ याने चव्हाण यांच्या डोक्यात दगड मारण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. दगडाचा वार चुकवण्यासाठी चव्हाण यांनी डावा हात वर केला. त्यावेळी दगड त्यांच्या डाव्या हाताच्या पंजावर लागला आणि ते जखमी झाले. (Kolhapur Kalamba Jail Attack)
सहा कैद्यांना दुसऱ्या कारागृहात हलवणार
घटनेनंतर कारागृह प्रशासनाने संबंधित सहा कैद्यांना दुसऱ्या कारागृहात हलवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असून, अमरावती, नागपूर आणि येरवडा येथील कारागृहांमध्ये त्यांना हलवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर या कैद्यांचे स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे कळंबा कारागृहातील सुरक्षा आणि कैद्यांकडून अधिकाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.