Malegaon Robbery : मालेगाव तालुक्यातील नांदगाव बुद्रुक–आनंदवाडी शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोड्याची थरारक घटना घडलीय. लोखंडी शस्त्रे हातात घेऊन आलेल्या चार ते पाच दरोडेखोरांनी घरात घुसून कुटुंबीयांना धमकावत मारहाण केली. यामध्ये वृद्धेसह तिघे जखमी झाले असून, दरोडेखोरांनी रोकड, सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा सुमारे 3 लाख 37 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला.
घरात घुसून थेट हल्ला
नांदगाव बुद्रुक–आनंदवाडी रस्त्यालगत शेताजवळ प्रकाश गंगाधर सोनवणे यांचे घर आहे. बुधवारी (दि. 16) मध्यरात्रीच्या सुमारास प्रकाश सोनवणे आणि त्यांच्या पत्नी निर्मला हे घरालगतच्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपले होते. तर त्यांची वृद्ध आई राजसबाई आणि सून घरात झोपल्या होत्या. याच वेळी लोखंडी शस्त्रे घेऊन आलेल्या दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. त्यांनी प्रकाश सोनवणे, निर्मला आणि राजसबाई यांना धमकावत मारहाण केली. सुनेच्या अंगावरील दागिने काढून घेतल्याचेही समोर आले आहे.
PM Narendra Modi Diet : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 76वा वाढदिवस आहे. वय वाढत असताना फिटनेस आणि ऊर्जा टिकवून ठेवणं अनेकांसाठी आव्हान ठरतं. मात्र, पंतप्रधान मोदी ...
कपाट फोडून रोकड-दागिने लुटले
दरोडेखोरांनी घरातील कपाट फोडून त्यातील रोकड, सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा ऐवज लुटला. या संपूर्ण घटनेत सुमारे 3 लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, सोनवणे यांचा मुलगा चारचाकी वाहनाने घरी पोहोचला. वाहनाचा आवाज आणि दिव्यांचा प्रकाश दिसताच दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
श्वान पथक, फॉरेन्सिक टीमकडून तपास
दरोड्याची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आरोपींचा माग काढण्यासाठी श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. घटनास्थळावरून ठसे आणि इतर महत्त्वाचे पुरावे संकलित करण्यात आले आहेत. हल्ल्यात जखमी झालेल्या प्रकाश सोनवणे, निर्मला सोनवणे आणि राजसबाई सोनवणे यांना उपचारासाठी मालेगाव शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
फरार दरोडेखोरांचा शोध सुरू
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावंजी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. फरार दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके विविध दिशांनी रवाना करण्यात आली आहेत. या घटनेनंतर ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना रात्रीच्या वेळी विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.