नाशिक : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकची धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनविषयक ओळख देशासह जगभर पोहोचवण्यासाठी व्यापक माध्यम आराखडा तयार करण्याचे निर्देश माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी दिले. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या सभागृहात माध्यम आराखड्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत कुंभमेळ्याच्या प्रसिद्धीसाठी कोणत्या माध्यमांचा आणि कोणत्या पद्धतीने वापर करायचा, यावर चर्चा करण्यात आली.
डिजिटलसह पारंपरिक माध्यमांवर भर
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे १२ वर्षांनंतर कुंभमेळा होत असल्याने त्याचे प्रभावी ब्रँडिंग करण्यासाठी पारंपरिक माध्यमांसोबतच डिजिटल, सोशल मीडिया आणि दृक्-श्राव्य माध्यमांचा समन्वयित वापर करावा, असे ब्रिजेश सिंह यांनी सांगितले. कुंभमेळ्याची वैशिष्ट्ये, धार्मिक परंपरा, नाशिकचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा, गोदावरी नदी आणि प्रमुख तीर्थस्थळांची माहिती देश-विदेशातील भाविक आणि पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नियोजनबद्ध प्रसिद्धी मोहीम राबवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
Nashik Crime News : नाशिकच्या गंगापूर रोडवर रात्रीच्या अंधारात दुभाजकावरील झाडांची कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जाहिरात फलक स्पष्ट दिसावा ...
नाशिकच्या पर्यटनाला मिळणार नवी ओळख
कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक-त्र्यंबकेश्वरची स्वतंत्र पर्यटन ओळख निर्माण करण्यावरही भर देण्यात येणार आहे. यामध्ये अध्यात्मिक स्थळे, स्थानिक कला-संस्कृती, खाद्यपरंपरा, वारसा स्थळे आणि पर्यटनस्थळांचे प्रभावी सादरीकरण केले जाणार आहे. यासाठी विविध माध्यमांसाठी स्वतंत्र आशय निर्मिती, प्रसिद्धी साहित्य आणि सोशल मीडिया मोहिमांचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.
अफवा आणि चुकीच्या माहितीवर तातडीने कारवाई
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वरसह संपूर्ण जिल्ह्यात सुरू असलेल्या दीर्घकालीन पायाभूत सुविधा आणि विकासकामांची माहितीही जनतेपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात आला. तसेच कुंभमेळ्याबाबत चुकीची माहिती किंवा अफवा पसरल्यास त्याचे तातडीने खंडन करण्याच्या सूचनाही ब्रिजेश सिंह यांनी दिल्या. कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकासकामांची सविस्तर माहिती बैठकीत दिली.
रामकुंड परिसराची पाहणी
बैठकीनंतर ब्रिजेश सिंह यांनी रामकुंड परिसराला भेट देऊन पाहणी केली. कुंभमेळ्याच्या काळात भाविकांना उपलब्ध होणाऱ्या सुविधा, प्रमुख स्थळांचे माध्यमीय सादरीकरण आणि प्रसिद्धीसाठी आवश्यक बाबींची त्यांनी माहिती घेतली. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. संदीप कर्णिक, माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक डॉ. किशोर गांगुर्डे, कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, उपसंचालक डॉ. किरण मोघे, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.





