Nashik Crime News : नांदगाव तालुक्यातील मन्याड चौकी परिसरातून अवघ्या आठ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. 36 तास उलटूनही तनु नावाच्या या चिमुकलीचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यातच या प्रकरणात चौकशी करण्यात आलेल्या एका इसमाने गळफास घेऊन जीवन संपवल्याने प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे.
नेमकं काय घडलं ?
गुरुवारी (17 सप्टेंबर) मध्यरात्री मन्याड चौकी परिसरात मछिंद्र मोरे हे कुटुंबासह घराबाहेर झोपले होते. रात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास मछिंद्र आणि त्यांच्या पत्नीच्या मध्ये झोपलेली आठ महिन्यांची मुलगी तनु अचानक बेपत्ता झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. कुटुंबीयांनी तसेच ग्रामस्थांनी परिसरात शोध घेतला. मात्र, चिमुकलीचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
श्वान पथकाकडूनही शोध
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. चिमुकलीचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली. श्वान पथकाने दाखवलेल्या दिशेने तसेच तपासातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी काही नातेवाईकांसह इतर संशयितांची चौकशी केली. यामध्ये श्रावण मोरे यांचीही गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर संशयितांना घरी सोडण्यात आल्याची माहिती आहे.
Nashik Manisha Jejurkar Case : प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या मृत्यू प्रकरणाला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त ...
चौकशी झालेल्या इसमाने घेतला गळफास
दरम्यान, शुक्रवारी पहाटे श्रावण मोरे यांनी झाडाला गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेनंतर त्यांच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी रुग्णालय परिसरात ठिय्या मांडला.
नातेवाईकांचा पोलिसांवर गंभीर आरोप
श्रावण मोरे यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या चौकशीदरम्यान मारहाण आणि त्रास दिल्यामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप केला आहे. मयताचे पुत्र सुनील मोरे, सून सुनीता मोरे यांच्यासह नातेवाईकांनी हे आरोप केले आहेत. मात्र, या आरोपांबाबत पोलिसांनी सध्या अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. ‘प्रकरणाचा तपास सुरू असून तपास पूर्ण झाल्यानंतर सविस्तर माहिती दिली जाईल,’ अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे.
तनुचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान
एकीकडे आठ महिन्यांच्या चिमुकलीचा 36 तासांनंतरही शोध लागलेला नाही, तर दुसरीकडे प्रकरणात चौकशी झालेल्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे तपासाला वेगळे वळण मिळाले आहे. चिमुकली नेमकी कुठे आहे? ती घरातून कशी गायब झाली? तसेच श्रावण मोरे यांच्या मृत्यूचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, यासह सर्व शक्यतांचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. चिमुकलीचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची पथके विविध दिशांनी तपास करत असून, या प्रकरणातील सत्य तपासातूनच स्पष्ट होणार आहे.






