Saturday, September 19, 2026

Thane Crime: गुटखा तस्करीचा पर्दाफाश! कळवा पोलिसांकडून दोन वॅगनआरसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

Thane Crime: गुटखा तस्करीचा पर्दाफाश! कळवा पोलिसांकडून दोन वॅगनआरसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
ठाणे: कळवा पोलिसांनी गुटख्याचा अवैध पद्धतीने व्यापार करणाऱ्यांवर मोठी कारवाई केलेली आहे. पोलिसांनी सापळा रचून गुटखा विक्रीच्या तस्करीचा डाव उधळला आहे. नाशिकवरून ठाणे आणि नवी मुंबईमध्ये गुटखा आणि पान मसाला नेणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईमध्ये गुटखा आणि पान मसाला आणण्यासाठी वापरलेल्या दोन मारुती सुझुकी वॅगनआर वाहनांसह १२.७१ लाख रुपये किंमतीचा अवैध माल जप्त केला. कळवा पोलिसांनी जप्त केलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत २६.८१ लाख रुपये इतकी आहे.
कळव्याचे सहायक पोलीस आयुक्त संकेत देवळेकर यांना १६ सप्टेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. स्थानिक बाजारपेठांमध्ये वितरणासाठी नाशिक-मुंबई महामार्गावरून मारूती सुझूकी बॅलेनो आणि टाटा टिएगो या दोन वाहनांमधून गुटखा आणि पान मसालाची अवैध रित्या वाहतूक केली जात असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांना मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतापराव भोसले यांच्या निर्देशानुसार, कळवा पोलिसांच्या एका विशेष पथकाने खारेगाव टोल नाक्याजवळ सापळा रचला. सकाळी अंदाजे ६.३० वाजता, अधिकाऱ्यांनी दोन संशयित वाहने अडवली. सखोल तपासणीत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला जप्त करण्यात आला.
"नाशिकहून ठाणे आणि नवी मुंबईच्या दिशेने गुटखा आणि पान मसाल्याची अवैध रित्या होत असल्याची विश्वसनीय माहिती मिळताच, आमच्या पथकांनी तात्काळ खारेगाव टोल नाक्यावर सापळा रचला. कळवा पोलिसांच्या विशेष पथकाने दोन्ही चार चाकी, गुटखा आणि पान मसाला सोबतच दोन्हीही आरोपींना ताब्यात घेतले आहेत. आरोपीच कार चालक होते. ह्या कनेक्शनचे कुठपर्यंत पाळे- मुळे आहेत, ह्याचा शोध आमच्या टीमकडून घेतला जात आहे. ह्या प्रकरणामधील सर्वच दोषींवर आमच्या टीमकडून कारवाई केली जाणार आहे, " अशी माहिती कळवा पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने माध्यमांना दिली. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या संबंधित तरतुदींनुसार आणि अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ च्या कलम २६(२), २७(२) आणि ५९ अंतर्गत कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >