Nashik Crime News: नाशिकच्या अशोकस्तंभ परिसरातील मानाचा राजा गणपतीच्या दर्शनासाठी जातो, असं सांगून दुकानातून बाहेर पडलेले 46 वर्षीय औषध व्यावसायिक मुकेश गोवर्धनदास ओबेराय यांचा ठाणे खाडी परिसरात मृतदेह आढळून आला आहे. 17 सप्टेंबरपासून ते बेपत्ता होते. त्यांच्या बेपत्ता होण्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पोलिसांच्या तांत्रिक तपासानंतर त्यांचा मृतदेह ठाण्यात आढळून आला. आजारपणाची समस्या, जबाबदाऱ्या आणि त्यातून निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे ते चिंतेत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या तणावातून त्यांनी ठाणे गाठून टोकाचं पाऊल उचलल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे.
गणपतीच्या दर्शनासाठी दुकानातून बाहेर पडले
पोलिसांच्या माहितीनुसार, 17 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास मुकेश ओबेराय गोळे कॉलनीतील त्यांच्या औषधांच्या दुकानात आले होते. काही वेळाने त्यांनी दुकानातील कर्मचारी आदित्य पाटेकर यांना अशोकस्तंभ येथील मानाच्या राजा गणपतीचं दर्शन घेऊन दहा मिनिटांत परत येतो, असं सांगितलं आणि दुकानातून बाहेर पडले. मात्र, बराच वेळ उलटूनही ते दुकानात किंवा घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी त्यांच्या दोन्ही मोबाईल क्रमांकांवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही मोबाईल बंद असल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.
Nashik Crime News: नाशिकच्या पंचवटीतील मालेगाव स्टॅण्ड परिसरात सोमवारी सकाळी उभ्या असलेल्या मारुती ओमनी व्हॅनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने खळबळ ...
मोबाईल लोकेशनने तपासाला मिळाली दिशा
नातेवाईकांनी विविध ठिकाणी शोध घेतल्यानंतरही मुकेश ओबेराय यांचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर त्यांचे बंधू मनिष ओबेराय यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 140(3) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर मुकेश ओबेराय यांच्या मोबाईल लोकेशनसह त्यांनी केलेल्या संभाव्य प्रवासाच्या मार्गांचीही तांत्रिक तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान त्यांचं लोकेशन ठाण्याच्या दिशेने असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सरकारवाडा पोलिसांचं पथक तातडीने ठाण्याकडे रवाना झालं.
ठाणे खाडीत मृतदेह आढळला
ठाणे खाडी परिसरात एका पुरुषाचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर नातेवाईकांच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. हा मृतदेह मुकेश ओबेराय यांचाच असल्याचं स्पष्ट झालं. 17 सप्टेंबरपासून बेपत्ता असलेल्या ओबेराय यांच्या मृत्यूची माहिती 19 सप्टेंबर रोजी उशिरा समोर आली. या घटनेमुळे नाशिक शहरासह औषध व्यवसाय क्षेत्रातही हळहळ व्यक्त होत आहे.
कौटुंबिक आजारपणामुळे तणावात होते ?
प्राथमिक चौकशीत मुकेश ओबेराय यांच्या कुटुंबात काही काळापासून आजारपणाची समस्या असल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबातील वैद्यकीय परिस्थिती, जबाबदाऱ्या आणि त्यातून निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे ते चिंतेत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या तणावातून त्यांनी ठाणे गाठून टोकाचं पाऊल उचलल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. मात्र, मृत्यूमागचं नेमकं कारण आणि संपूर्ण घटनाक्रम तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.






