Monday, September 21, 2026

Nashik Manisha Jejurkar Case : डॉ. नीलेश जेजुरकरांच्या चौकशीनंतर डॉ. स्वाती चव्हाण अटकेत; मनीषा जेजुरकर प्रकरणाला नवं वळण

Nashik Manisha Jejurkar Case : डॉ. नीलेश जेजुरकरांच्या चौकशीनंतर डॉ. स्वाती चव्हाण अटकेत; मनीषा जेजुरकर प्रकरणाला नवं वळण

Nashik Manisha Jejurkar Case : प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाला आता महत्त्वाचं वळण मिळालं आहे. सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर डॉ. मनीषा यांचे पती डॉ. नीलेश जेजुरकर यांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं होतं. त्यांच्या चौकशीनंतर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. स्वाती चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईनंतर मनीषा जेजुरकर मृत्यू प्रकरणातील तपासाची दिशा आणखी महत्त्वाची बनली आहे.

पतीच्या चौकशीनंतर डॉ. स्वाती यांचं नाव समोर

डॉ. मनीषा जेजुरकर यांनी 6 मार्च 2026 रोजी गंगापूर रोडवरील राहत्या घरी जीवन संपवलं होतं. सुरुवातीला या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर मनीषा यांच्या कुटुंबीयांनी पती डॉ. नीलेश जेजुरकर यांच्यासह डॉ. स्वाती चव्हाण यांच्याबाबत गंभीर आरोप केले. डॉ. नीलेश जेजुरकर यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी केली. या चौकशीत डॉ. स्वाती चव्हाण यांचं नाव समोर आल्याची माहिती आहे. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत डॉ. चव्हाण यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

कुटुंबीयांनी केले होते गंभीर आरोप

मनीषा जेजुरकर यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनुसार, डॉ. नीलेश हे पत्नीच्या गरजांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे. तसेच कौटुंबिक निर्णय घेताना ते दुसऱ्या महिला डॉक्टरचा सल्ला घेत असल्याचंही कुटुंबीयांनी म्हटलं होतं. डॉ. नीलेश जेजुरकर आणि डॉ. स्वाती चव्हाण यांच्यात जवळीक असल्याचा आरोपही मनीषा यांच्या कुटुंबीयांनी केला होता. जानेवारी 2026 मध्ये डॉ. स्वाती चव्हाण यांनी मनीषा यांना फोन करून अपमानास्पद आणि मानसिक त्रास देणारी वक्तव्ये केल्याचाही दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या कथित त्रासामुळे मनीषा मानसिक तणावात होत्या आणि त्यातूनच त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा दावा फिर्यादी पक्षाकडून करण्यात आला आहे. मात्र, हे सर्व आरोप असून त्यांची सत्यता तपासातून स्पष्ट होणे बाकी आहे.

आता तपासात कोणते धागेदोरे समोर येणार ?

पती डॉ. नीलेश जेजुरकर यांच्यानंतर डॉ. स्वाती चव्हाण यांनाही अटक झाल्याने या प्रकरणातील तपासाला वेग आला आहे. दोघांमधील नेमकं काय संबंध होते, मनीषा जेजुरकर यांच्या मृत्यूशी त्याचा काही संबंध होता का आणि कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. डॉ. स्वाती चव्हाण यांच्या चौकशीतून या प्रकरणातील आणखी कोणते धागेदोरे समोर येतात, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >