Tuesday, September 22, 2026

Sohala Marathi Movie : कुटुंब, नाती आणि आयुष्याच्या नव्या टप्प्याची हळवी कहाणी; ‘सोहळा’ चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरने वेधले लक्ष!

Sohala Marathi Movie : कुटुंब, नाती आणि आयुष्याच्या नव्या टप्प्याची हळवी कहाणी; ‘सोहळा’ चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरने वेधले लक्ष!

मुंबई : अभिनेत्री सोनाली बेंद्रेने आगामी ‘सोहळा’ या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटाच्या प्रस्तुतकर्ती म्हणून सोनाली बेंद्रे प्रथमच सहभागी झाली आहे. पोस्टरमधून तिने प्रेक्षकांची ओळख ‘पश्या’ या १३ वर्षीय मुलाशी करून दिली आहे. आशा, कुटुंब आणि आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या निवडींची भावस्पर्शी कहाणी सांगणारा हा चित्रपट १६ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. (Sohala Marathi Movie)

 
View this post on Instagram
 

A post shared by Sonali Bendre (@iamsonalibendre)

बालपणातील आठवणींचा हळव्या सोहळा

‘सोहळा’ म्हणजे उत्सव. चित्रपटात एका लहान मुलाच्या आयुष्यातील हळवा आणि महत्त्वाचा संस्कार केंद्रस्थानी आहे. कुटुंबीय आणि जवळच्या आप्तस्वकीयांच्या उपस्थितीत साजरा होणारा हा दिवस म्हणजे मुलाने पहिल्यांदा वडिलांच्या चपला घालण्याचा दिवस. बालपणातून मोठेपणाकडे जाणाऱ्या प्रवासातील हे प्रतीकात्मक पाऊल आहे. (Sohala Marathi Movie)

पश्यासाठी हा दिवस म्हणजे आयुष्यातील मोठ्या उत्सवाची चाहूल असते. नवीन कपडे, आशीर्वाद, मिठाई, हशा-आनंद आणि संपूर्ण कुटुंबासोबत गावातील मंदिरात जाण्याची त्याची तयारी सुरू असते. मात्र, हा सोहळा अनुभवण्याआधीच त्याच्या आयुष्याला वेगळे वळण मिळते. पुढे काय घडते, यापेक्षा पश्या कोणती निवड करतो, याभोवती चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. (Sohala Marathi Movie)

सोनाली बेंद्रे यांची चित्रपटाबद्दलची भावना

चित्रपटाची प्रस्तुतकर्ती म्हणून ‘सोहळा’शी जोडल्याबद्दल सोनाली बेंद्रे म्हणाली की, गेल्या अनेक वर्षांत अनेक चित्रपटांशी नाव जोडण्याच्या विनंत्या आल्या; मात्र त्यांनी फार क्वचितच त्यासाठी होकार दिला आहे. ‘सोहळा’ हा त्या मोजक्या चित्रपटांपैकी एक आहे. (Sohala Marathi Movie)

हा चित्रपट पाहिल्यानंतरही बराच काळ मनात राहतो, असे सांगत त्यांनी या कथेची तुलना शांतपणे आपल्यात बदल घडवून आणणाऱ्या पुस्तकाशी केली. अभिनेत्री म्हणून नव्हे, तर चित्रपटाच्या कथेवर आणि दिग्दर्शक सैकत बागबान यांच्या दृष्टिकोनावर विश्वास असलेली व्यक्ती म्हणून आपण या चित्रपटाला प्रेक्षकांपर्यंत घेऊन येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दिग्दर्शक सैकत बागबान काय म्हणाले?

दिग्दर्शक सैकत बागबान यांच्या मते, ‘सोहळा’ हा बालपण, मैत्री, कुटुंब आणि व्यक्तिमत्त्व घडवणाऱ्या छोट्या-छोट्या क्षणांचा उत्सव आहे. या विश्वाच्या केंद्रस्थानी पश्या असून, पहिल्या पोस्टरमधून त्याची प्रेक्षकांशी ओळख होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. (Sohala Marathi Movie)

Rose Audio Visuals आणि सोनाली बेंद्रे आपल्या पहिल्या फीचर फिल्मला प्रस्तुत करत असल्याने या प्रवासाला विशेष प्रोत्साहन मिळाल्याचेही तिने सांगितले.

१६ ऑक्टोबरला देशभरात होणार प्रदर्शित

‘सोहळा’चे दिग्दर्शन सैकत बागबान यांनी केले आहे. Rose Audio Visualsच्या बॅनरखाली गोल्डी बहल, तर Carryon Filmsच्या बॅनरखाली सचिन श्रीवास्तव, रत्ना श्रीवास्तव आणि कविता बागबान यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

चित्रपटात प्रविण दळिंबकर, देवदत्त प्रशांत गोणे, वर्षा मालवडकर, वैष्णवी संजय घोडके आणि Alessandra Whelan Merediz यांच्या प्रमुख भूमिका आहेत. Cinepolisकडून चित्रपटाचे संपूर्ण भारतातील थिएटर वितरण करण्यात येणार आहे.

‘सोहळा’चा ट्रेलर २९ सप्टेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून, चित्रपट १६ ऑक्टोबर २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Sohala Marathi Movie)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >