Pandharpur Crime News : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. पंढरपूर तालुक्यातही असंच वयाचं बंधन नसलेलं प्रेम पहायला मिळालंय. मात्र, पंढरपूर तालुक्यातील या प्रेमप्रकरणाचा शेवट धक्कादायक गुन्ह्यात झाल्याचं समोर आलं आहे. दोन वृद्धांमधील प्रेमसंबंधातून 70 वर्षीय अंबादास खांडेकर यांची हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी पोलिसांनी मंगल होनमाने या वृद्ध महिलेला अटक केली आहे.
नेमकं प्रकरण काय ?
अंबादास खांडेकर आणि मंगल होनमाने यांच्यात गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली. मात्र, या नात्यातून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. याच वादातून मंगल होनमाने यांनी अंबादास यांची हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक तपास आहे. ही घटना 27 जुलैच्या आसपास घडल्याची माहिती आहे. त्यानंतर अंबादास यांचा मृतदेह शेतात अर्धवट जळालेल्या आणि पुरलेल्या अवस्थेत आढळून आला. 2 ऑगस्ट रोजी गावातील काही नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक टीमच्या मदतीने घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. तपासादरम्यान अंबादास खांडेकर बेपत्ता असल्याचे समोर आले. त्यानंतर अंबादास यांच्या दोन्ही मुलींचे डीएनए नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. डीएनए अहवालातून मृतदेह अंबादास खांडेकर यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. ओळख पटताच पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली.
पुणे : पुण्यातील लोहगड परिसरात झालेल्या केतन अग्रवाल हत्याप्रकरणात पोलिसांच्या तपासातून आणखी काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुणे ग्रामीण ...
वृद्ध महिलेला अटक
तपासादरम्यान अंबादास आणि मंगल होनमाने यांच्यातील संबंध तसेच त्यांच्यात झालेल्या वादाची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांत मंगल होनमाने यांना अटक केली. प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, दोघांमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला आणि हत्येमागील संपूर्ण पार्श्वभूमी काय आहे, याचा तपास अद्याप सुरू आहे. या प्रकरणातील पुढील तपास पोलीस करत आहेत.






