Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातील भडगाव परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. बनावट रुद्राक्ष विक्रीतून मिळालेल्या ८०० रुपयांच्या वादातून आतेभावाने मामेभावाला दगडाने ठेचलय. खून केल्यानंतर संशयिताने मृताच्या तोंडातील दात दगडाने तोडून ते बॅगेत ठेवल्याची माहिती समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धर्मा पवार (४०) असे दगडाने मारहाण ठेचून खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी मृताचा ३० वर्षीय आतेभाऊ जुगा पवार याला पोलिसांनी अटक केली आहे.
नेमकं प्रकरण काय ?
धर्मा पवार आणि जुगा पवार हे दोघेही रुद्राक्ष विक्रीचा व्यवसाय करत होते. काल दोघांनी मिळून ८०० रुपयांचे रुद्राक्ष विकले. मात्र इथेच मोठा गेम सुरु झाला. या विक्रीतून मिळालेल्या पैशांच्या वाटणीवरून दोघांमध्ये वाद झाला. सुरुवातीला झालेला वाद त्यावेळी मिटला. मात्र सोमवारी हा वाद पुन्हा उफाळून आला. सोमवारी रात्री साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास नवरदेवळा स्टेशनच्या परिसरात धर्मा आणि जुगा या दोघांनी मद्यप्राशन केले. याचवेळी रुद्राक्ष विक्रीतून मिळालेल्या ८०० रुपयांच्या व्यवहारावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला.
Pandharpur Crime News : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. पंढरपूर तालुक्यातही असंच वयाचं बंधन नसलेलं प्रेम पहायला मिळालंय. मात्र, पंढरपूर तालुक्यातील या ...
दात तोडून बॅगेत ठेवले अन्...
प्राथमिक माहितीनुसार, दारूच्या नशेत वाद वाढत गेल्याने संशयित जुगा पवार याने धर्मा पवार याच्यावर दगडाने हल्ला केला. दरम्यान, गंभीर जखमी झाल्याने धर्मा पवार याचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे घटनेनंतर संशयिताने मृतदेहाजवळच मृताच्या तोंडातील दात दगडाने तोडल्याचे उघडकीस आले आहे. हे दात त्याने आपल्या बॅगेत जमा करून ठेवले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयिताजवळील बॅगेची झडती घेतली असता त्यात मृत धर्मा पवार याचे तोडलेले दात आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच बॅगेत दोन जिवंत कबुतरेही आढळून आली. ही कबुतरे संशयिताने खाण्यासाठी आणल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
मृताच्या दातांशी छेडछाड का केली ?
धर्मा पवार आणि जुगा पवार हे दोघे नात्यातील असून, त्यांच्या उपजीविकेसाठी गावोगावी फिरून रुद्राक्ष विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती आहे. एकत्रित व्यवसायातून मिळालेल्या पैशांच्या व्यवहारावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्यातूनच ही गंभीर घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपी जुगा कांतिलाल पवार याला अटक केली असून त्याच्याकडून घटनेबाबत अधिक माहिती घेतली जात आहे. सोबतच मृताच्या दातांशी छेडछाड करण्यामागील नेमका प्रकार तसेच घटनेपूर्वी दोघांमध्ये झालेला वाद याबाबत पोलिस तपास करीत आहेत.






