Tuesday, September 22, 2026

Nitesh Rane News: सिंधुदुर्गमधील नुकसानीसाठी स्वतंत्र निकषांचा विचार करा- पालकमंत्री नितेश राणे यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी

Nitesh Rane News: सिंधुदुर्गमधील नुकसानीसाठी स्वतंत्र निकषांचा विचार करा- पालकमंत्री नितेश राणे यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी
मुंबई: "सिंधुदुर्ग जिल्हा दुष्काळाच्या ट्रिगर-१ मध्ये येत असून, जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत. कोकणाची भौगोलिक आणि कृषी परिस्थिती इतर भागांपेक्षा वेगळी असल्याने नुकसानभरपाईचे निकष स्वतंत्रपणे विचारात घेऊन सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत उपलब्ध करून द्यावी", अशी मागणी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी केली. आंबा आणि काजू पिकांचे यापूर्वीही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून यंदाची एकूण पीक परिस्थिती गंभीर असल्याचेही त्यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले.
कोकण विभागातील पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सीबीडी बेलापूर येथील सिडको सभागृहात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत कोकणातील पावसातील खंडामुळे भात, नाचणीसह खरीप पिकांवर झालेल्या परिणामाचा आढावा घेण्यात आला. या वेळी मंत्री राणे यांनी सिंधुदुर्गातील पीक परिस्थिती मांडताना नुकसानीची वस्तुस्थिती लक्षात घेऊन सकारात्मक दृष्टिकोनातून मदतीचा निर्णय घेण्याची मागणी केली. बैठकीस फलोत्पादन व रोजगार हमी योजना मंत्री तथा रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले, आमदार मंदा म्हात्रे, सुलभा गायकवाड, दीपक केसरकर यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आमदार निलेश राणे, शेखर निकम यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले. सिंधुदुर्गातील पिकांचे पंचनामे करताना प्रत्यक्ष नुकसानीची नोंद घ्यावी, अशी मागणी राणे यांनी केली. आंबा आणि काजू या महत्त्वाच्या पिकांचे यापूर्वी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यंदाही पीक परिस्थिती गंभीर असल्याने कोकणाची भौगोलिक व कृषी परिस्थिती लक्षात घेऊन नुकसानभरपाईबाबत स्वतंत्रपणे विचार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, कोकणात पावसातील खंडामुळे झालेल्या नुकसानीचे फक्त आकडेवारीच्या आधारे मूल्यांकन न करता अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वस्तुनिष्ठ माहिती संकलित करावी, असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. पीकविमा, एनडीआरएफ आणि शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी सक्रियपणे काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
प्रत्येक शेतकरी आणि त्याच्या कुटुंबाचे वर्षभराचे आर्थिक गणित शेतीशी जोडलेले आहे. त्यामुळे महसूल, कृषी आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन परिस्थितीची पाहणी करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार नुकसानीचे पंचनामे आणि क्षेत्रीय स्तरावरील वस्तुनिष्ठ माहिती तातडीने संकलित करावी. पिकांची प्रत्यक्ष स्थिती, पावसातील खंड आणि त्याचा पिकांवर झालेला परिणाम याची अचूक नोंद करून पुढील मदतीसाठी आवश्यक प्रस्ताव तयार करावेत, असे भरणे यांनी सांगितले. पीकविमा घेतलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई वेळेत मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग आणि त्यासंबंधीची कार्यवाही पीक परिस्थितीनुसार तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना कृषी विभागाला देण्यात आल्या. पीकविम्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी. तसेच एनडीआरएफ आणि शासनाच्या विविध योजनांमधून उपलब्ध होणारी मदत वेळेत मिळवून द्यावी, असे भरणे यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही प्रशासनाने गांभीर्याने घ्यावा. आवश्यक भागात पाणी आणि चारा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजन करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

पंचनाम्यात हलगर्जीपणा नको - भरत गोगावले

रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनीही पंचनामे करताना अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन वस्तुस्थितीची अचूक नोंद करावी, अशी सूचना केली. पंचनाम्याच्या कामात हलगर्जीपणा होता कामा नये. महसूल आणि कृषी विभागातील तालुका व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घ्यावी, असे त्यांनी सांगितले. कोकणातील लहान भूधारणा आणि वेगळी कृषी परिस्थिती लक्षात घेऊन पंचनामे करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी दुष्काळाच्या संभाव्य परिस्थितीचा विचार करून केवळ पावसाचे प्रमाण न पाहता पिकांच्या गरजेच्या काळातील पाऊस आणि प्रत्यक्ष पीकस्थितीचा आढावा घेऊन ट्रिगर तपासावा, असे सांगितले. यासंदर्भातील प्रस्ताव तीन दिवसांत विभागीय आयुक्तांमार्फत सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पीक परिस्थितीनुसार पीक कापणी प्रयोगांचे वेळापत्रक निश्चित करून ते तातडीने पूर्ण करण्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीत ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील पर्जन्यमान, पावसातील खंड, पिकांची सद्यस्थिती, संभाव्य नुकसान आणि शेतकऱ्यांच्या अडचणी यांचे सादरीकरण केले. विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी सर्व यंत्रणा समन्वयाने काम करतील, असे सांगितले.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >