Nashik : गणेश विसर्जन मिरवणुका आणि वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी व्यापक सुरक्षा आराखडा तयार केला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तब्बल ४ हजार ७९६ पोलीस अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान आणि वॉर्डन तैनात करण्यात येणार आहेत. रावेर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली असून, अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी विविध विशेष पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.
रावेर घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन अलर्ट
दोन दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे घरगुती गणपतीची मूर्ती रिक्षातून विसर्जनासाठी नेली जात असताना काही जणांनी रिक्षा अडवून पुढे जाण्यास मज्जाव केला. त्यातून शाब्दिक वाद होऊन किरकोळ दगडफेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून विसर्जन मिरवणुकांदरम्यान विशेष सतर्कता बाळगण्यात येत आहे.
Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातील भडगाव परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. बनावट रुद्राक्ष विक्रीतून मिळालेल्या ८०० रुपयांच्या वादातून आतेभावाने मामेभावाला ...
विसर्जनस्थळांवर पोलिसांची करडी नजर
गर्दीचा ताण वाढल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने कारवाई करता यावी, यासाठी दंगल नियंत्रण पथकाच्या दोन तुकड्या, रॅपिड अॅक्शन फोर्स आणि राज्य राखीव पोलीस दलाची एक कंपनी सज्ज ठेवण्यात येणार आहे. तसेच दहशतवादविरोधी शाखेची १४ पथके, गुन्हे शाखेच्या १३ स्ट्राइकिंग फोर्स आणि सहा जलद प्रतिसाद पथके तैनात राहणार आहेत. संवेदनशील ठिकाणे, गर्दीचे मार्ग, प्रमुख मिरवणूक मार्ग आणि महत्त्वाच्या विसर्जनस्थळांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. गणेश भक्तांना विसर्जनावेळी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी विविध विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मिरवणुका शांततेत आणि सुरळीत पार पडाव्यात, यासाठी पोलिसांकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
'असा असेल बंदोबस्त'
चार पोलीस उपायुक्त, सात सहाय्यक पोलीस आयुक्त, ४४ पोलीस निरीक्षक, ७१ सहाय्यक पोलीस निरीक्षक, १३५ पोलीस उपनिरीक्षक, १० प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक, २ हजार पोलीस अंमलदार, ६०० महिला पोलीस अंमलदार, ५० नवप्रविष्ट पोलीस शिपाई, २५ नवप्रविष्ट महिला पोलीस शिपाई, १ हजार ३०० पुरुष व २५० महिला गृहरक्षक दलाचे जवान तसेच ३०० वॉर्डन यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.






