Tuesday, September 22, 2026

Uttar Pradesh Crime : घरात सुरू होती शांततेत पूजा आणि अचानक...; पत्नीसह दोन पुजाऱ्यांची हत्या, आझमगडमधील धक्कादायक घटनेचे सत्य काय?

Uttar Pradesh Crime :  घरात सुरू होती शांततेत पूजा आणि अचानक...; पत्नीसह दोन पुजाऱ्यांची हत्या, आझमगडमधील धक्कादायक घटनेचे सत्य काय?

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी, दोन पुजारी आणि स्वतःच्या मुलाची हत्या केल्यानंतर आरोपीने आपल्या तीन मुलांना घरात ओलीस ठेवले होते. पोलिसांनी तब्बल 8 तास चाललेल्या प्रयत्नांनंतर मुलांची सुखरूप सुटका केली. यावेळी झालेल्या चकमकीत आरोपी अरविंद सिंग गंभीर जखमी झाला. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

वाराणसी विभागाचे एडीजी नवीन अरोरा यांनी या कारवाईबाबत माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, पोलिसांनी जवळपास 7 तास आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला. मुलांना सोडून देण्याची विनंती पोलिसांकडून वारंवार करण्यात आली. मात्र, आरोपी कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हता. तो सकाळपर्यंत वेळ देण्याची मागणी करत होता.

दरम्यान, घरातून अचानक गोळीबाराचा आवाज आला. आरोपीने आपल्या 10 वर्षांच्या मुलावर गोळी झाडल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. परिस्थिती गंभीर असल्याने पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला. स्टन ग्रेनेड आणि अश्रुधुराचा वापर करत पोलिसांनी घरात प्रवेश केला.

पोलिसांना घरात येताना पाहून आरोपीने त्याच्या परवानाधारक रिव्हॉल्वरमधून पोलिसांच्या दिशेने 6 गोळ्या झाडल्या. त्यानंतर पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. या कारवाईत अरविंद सिंग जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, घरात पूजा सुरु असतानाच आरोपीने पत्नी आणि दोन पुजाऱ्यांची हत्या केली होती. त्यानंतर त्याने स्वतःच्या मुलाचीही हत्या केल्याचे समोर आले आहे. त्याने आपल्या इतर मुलांना घरात ओलीस ठेवले होते.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी तिन्ही मुलांना सुरक्षित बाहेर काढले. जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बराच वेळ घरात अडकून राहिल्याने इतर दोन मुलांना भूक, तहान आणि मानसिक धक्क्याचा सामना करावा लागला. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

भूतबाधेच्या संशयातून भयंकर हत्याकांड

दरम्यान पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भुतबाधाच्या संशयातून घरात पूजा ठेवण्यात आली होती. आठ वर्षांपूर्वी भावाच्या झालेल्या हत्येनंतर त्याचा आत्मा घरात त्रास देतोय आणि घरावर करणी झाली आहे, या संशयातून अरविंद सिंग याच्या घरात गेल्या चार दिवसांपासून तंत्र-मंत्र आणि पूजेचे आयोजन करण्यात आले होते. याचवेळी तो आक्रमक झाला आणि पत्नीसह दोन पुजाऱ्यांची हत्या केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >