Thursday, September 24, 2026

Minister Chhagan Bhujbal : मुंबई विद्यापीठ ग्रंथालय कंत्राट प्रकरणात मंत्री छगन भुजबळ दोषमुक्त

Minister Chhagan Bhujbal : मुंबई विद्यापीठ ग्रंथालय कंत्राट प्रकरणात मंत्री छगन भुजबळ दोषमुक्त

- विशेष एसीबी न्यायालयाचा निर्णय; कथित लाचखोरी प्रकरणात मोठा दिलासा

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील मध्यवर्ती ग्रंथालयाच्या कंत्राटाशी संबंधित कथित लाचखोरी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने गुरुवारी दोषमुक्त केले. २०१६ मध्ये घडलेल्या या प्रकरणात भुजबळ यांच्यावर खासगी विकासकाला भूखंड कमी दराने भाडेपट्ट्यावर देऊन त्यातून कथित आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाच्या सुनावणीनंतर विशेष एसीबी न्यायालयाने भुजबळांना दोषमुक्त करण्याचा निर्णय दिला.

कलिना येथील विद्यापीठाच्या संकुलात सुमारे २३ हजार ४३८ चौरस मीटर क्षेत्रफळावर मध्यवर्ती ग्रंथालयाची इमारत उभारण्याचे कंत्राट इंडिया बुल्स रिअल इस्टेट कंपनीला देण्यात आले होते. या व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. कंपनीने छगन भुजबळ पब्लिक वेल्फेअर फाऊंडेशनच्या खात्यात दोन टप्प्यांत अडीच-अडीच कोटी रुपये जमा केल्याचा दावा करण्यात आला होता. या व्यवहाराचा संबंध भुजबळ यांच्याशी जोडत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) देण्यात आले होते.

या प्रकरणात भुजबळ यांच्यासह तत्कालीन उपविभागीय अभियंता गजानन सावंत, कार्यकारी अभियंता हरीश पाटील, अधीक्षक अनिलकुमार गायकवाड, अपर सचिव संजय सोळंकी आणि बांधकाम सचिव एम. एच. शाहा यांनाही आरोपी करण्यात आले होते. व्यवहारामुळे राज्य सरकारचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा सरकारी पक्षाकडून करण्यात आला होता. मात्र, सुनावणीअंती न्यायालयाने भुजबळ यांना या प्रकरणातून दोषमुक्त केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >