Friday, September 25, 2026

Nandurbar Ganesh Visarjan 2026 : नंदुरबारमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, ‘हरिहर भेटी’कडे भाविकांचे लक्ष

Nandurbar Ganesh Visarjan 2026 : नंदुरबारमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, ‘हरिहर भेटी’कडे भाविकांचे लक्ष

Nandurbar Ganesh Visarjan 2026 : नंदुरबार शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सकाळपासून उत्साहात सुरुवात झाली आहे. प्रथम मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादा गणपतीच्या रथाचे पारंपरिक पद्धतीने दोरीने ओढून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. शहरातील विविध भागांतून मिरवणूक मार्गस्थ होत असून, ठिकठिकाणी भाविकांकडून दादा गणपतीची पूजा आणि आरती केली जात आहे.

पारंपरिक ‘हरिहर भेटी’कडे भाविकांचे लक्ष

नंदुरबारच्या गणेशोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेल्या दादा आणि बाबा गणपतीच्या पारंपरिक ‘हरिहर भेटी’कडे आता भाविकांचे लक्ष लागले आहे. रात्री बाराच्या सुमारास ही भेट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यंदा नंदुरबार जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे गणेशभक्तांकडून पाऊस पडू दे आणि दुष्काळाचे संकट दूर होऊ दे, अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी केली जात आहे. नंदुरबारमध्ये दादा आणि बाबा गणपतीच्या सार्वजनिक स्थापनेची परंपरा जुनी असून, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात करण्यापूर्वीपासून ही परंपरा सुरू असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, काळ्या मातीपासून कोणताही साचा न वापरता मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून या गणेशमूर्ती साकारल्या जातात.त्यामुळे या मूर्ती नंदुरबारकरांच्या श्रद्धेचे विशेष केंद्र बनल्या आहेत.

हलगीच्या तालावर नेत्यांनीही धरला ठेका

दरम्यान, दादा गणपतीच्या रथ ओढण्याच्या सोहळ्यात विविध राजकीय पक्षांचे नेतेही सहभागी झाले. माजी खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया गावित, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम रघुवंशी यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी आपल्या बहीण सुप्रिया गावित यांच्यासोबत हलगीच्या तालावर पारंपरिक पद्धतीने नृत्य केले. नंदुरबारच्या विसर्जन मिरवणुकीतील प्रसिद्ध पाच पावली’ नृत्याने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त

पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशे, हलगी आणि ‘पाच पावली’च्या तालावर गणेशभक्त आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ठिकठिकाणी गणरायाची आरती आणि पूजा केली जात असून, मिरवणूक हळूहळू पुढे सरकत आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.तसेच ध्वनिप्रदूषण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >