Saturday, September 26, 2026

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. एक्स्प्रेस वेवरील किलोमीटर 36 जवळ मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनमध्ये तीन वाहनांची जोरदार धडक झाली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. तीव्र उतारावर फेविकॉलसदृश्य अॅडहेसिव्ह केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकचे अचानक ब्रेक निकामी झाले. त्यानंतर या ट्रकने एका पिकअप व्हॅनला जोरदार धडक दिली. पिकअपला धडकल्यानंतर ट्रक पुढे असलेल्या कंटेनरलाही धडकला.अपघाताची तीव्रता एवढी होती की, पिकअप व्हॅनचा अक्षरशः चुराडा झाला. तर ट्रकच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी

अपघातग्रस्त कंटेनरमध्ये महिंद्रा कंपनीच्या गाड्या होत्या. तर दुसऱ्या ट्रकमध्ये फेविकॉलसदृश्य अॅडहेसिव्ह मटेरियल आणि तिसऱ्या वाहनामध्ये पुठ्ठा भरलेला होता. धडकेनंतर अॅडहेसिव्ह मटेरियल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर सांडले. दरम्यान, रस्त्यावर सांडलेले केमिकल हटवून मार्ग सुरक्षित करण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी झाली असून, महामार्ग पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >