Monday, September 28, 2026

Iran US conflict : होर्मुझच्या खाडीत इराणचा मोठा पराक्रम; अमेरिकेची अत्याधुनिक मानवरहित पाणबुडी केली जप्त

Iran US conflict : होर्मुझच्या खाडीत इराणचा मोठा पराक्रम; अमेरिकेची अत्याधुनिक मानवरहित पाणबुडी केली जप्त

तेहरान: पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि अमेरिकेसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने एक मोठी आणि खळबळजनक कारवाई केली आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या (IRGC) नौदलाने सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait of Hormuz) क्षेत्रात अमेरिकेच्या एका प्रगत मानवरहित पाणबुडीवर (Remus 600) यशस्वीरीत्या ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. या धडक कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

गुंतागुंतीच्या मोहिमेद्वारे कारवाई

इराणच्या सरकारी प्रसारकाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, ही कारवाई अत्यंत नियोजनबद्ध आणि गुप्तचर यंत्रणेच्या सहाय्याने पार पाडण्यात आली. आयआरजीसीच्या नौदलाच्या जवानांनी अचूक गुप्तचर माहिती (Intelligence) आणि आधुनिक इलेक्ट्रॉनिक युद्धाच्या (Electronic Warfare) तंत्रज्ञानाचा वापर करून ही अत्यंत गुंतागुंतीची मोहीम फत्ते केली. अमेरिकेची ही मानवरहित पाण्याखालील यंत्रणा इराणविरोधात हेरगिरीच्या उद्देशाने तैनात करण्यात आली होती, असा गंभीर आरोप इराणी लष्करी अधिकाऱ्यांनी केला आहे.(Iran America conflict)

‘रेमस ६००’ पाणबुडीची वैशिष्ट्ये

इराणी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या या अत्याधुनिक उपकरणाची ओळख ‘रेमस ६००’ (Remus 600) अशी पटवली आहे. ही एक अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली मानवरहित पाण्याखालील यंत्रणा (UUV) असून, ती मानवी हस्तक्षेपाशिवाय समुद्राखाली स्वतंत्रपणे लांबवर हालचाल करण्यास सक्षम आहे. गुप्त माहिती गोळा करण्याच्या कामात ही पाणबुडी अत्यंत प्रभावी मानली जाते.(Iran America conflict)

तज्ज्ञांकडे तपासणी सुरू

इराणी नौदलाने ही अमेरिकी पाणबुडी ताब्यात घेतल्यानंतर तिच्या तंत्रज्ञानाचा आणि आतील डेटाचा अभ्यास करण्यासाठी ती तातडीने तज्ज्ञांकडे सुपूर्द केली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे अमेरिका आणि इराणमधील आधीच ताणलेले संबंध आणखी बिकट होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिका यावर काय अधिकृत प्रतिक्रिया देणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >