Thursday, October 1, 2026

Pakistan Water Crisis : सिंधू जल करार स्थगितीनंतर पाकिस्तानात गंभीर जलसंकट; आंतरराष्ट्रीय मंचावर मदतीसाठी भारतासमोर विनवणी!

Pakistan Water Crisis : सिंधू जल करार स्थगितीनंतर पाकिस्तानात गंभीर जलसंकट; आंतरराष्ट्रीय मंचावर मदतीसाठी भारतासमोर विनवणी!

इस्लामाबाद : भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू जल करार (IWT) स्थगित केल्यापासून पाकिस्तानमधील जलसंकट अधिकच गंभीर झाले आहे. विविध आंतरराष्ट्रीय मंचांवर पाकिस्तानला कोणत्याही देशाकडून ठोस पाठिंबा मिळालेला नाही. त्यामुळे आता पाकिस्तानने नरमाईची भूमिका घेत भारतासमोर मदतीची विनंती चालवल्याचे दिसून येत आहे. "रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही," अशी ठाम भूमिका घेत भारताने हा करार स्थगित केला होता.(India Pakistan Water Dispute)

पाकिस्तानच्या जनतेवर गंभीर संकटाचा दावा

पाकिस्तानचे माहितीमंत्री अताउल्लाह तरार यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, भारताच्या या निर्णयाचा थेट परिणाम पाकिस्तानच्या सामान्य जनतेवर होत आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने या गंभीर परिस्थितीकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर पाकिस्तानातील लाखो लोकांवर मृत्यू ओढवू शकतो, असा भीतीदायक दावा त्यांनी केला आहे.

पाकिस्तानी मंत्र्यांचे प्रमुख मुद्दे:

  • पाण्याचा हक्क आणि आंतरराष्ट्रीय नियम: "भारताला पाण्याचा शस्त्र म्हणून वापर करण्याची परवानगी आम्ही देऊ शकत नाही, कारण पाकिस्तानातील 24 कोटी जनतेचा हा मूलभूत अधिकार आहे," असे तरार यांनी म्हटले. तसेच, कोणताही आंतरराष्ट्रीय करार एकतर्फी स्थगित करता येणार नाही, वादाच्या स्थितीतही नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

  • युद्धाची चेतावणी: पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या संयुक्त राष्ट्र महासभेतील (UNGA) भाषणाचा संदर्भ देत, आंतरराष्ट्रीय जलक्षेत्र आमच्या जनतेसाठी जीवनरेषा असल्याचे तरार म्हणाले. जर हा अधिकार हिरावून घेतला गेला, तर लोकांचा मृत्यू होईल आणि अशा परिस्थितीला 'युद्धाची कृती' (Act of War) मानले जाईल, अशी अप्रत्यक्ष चेतावणी त्यांनी दिली.(India Pakistan Water Dispute)

  • दशतवादाबाबत बचावात्मक भूमिका: भारताने सीमापार दहशतवादाचा दाखला देत सिंधू जल करार स्थगित करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. मात्र, पाकिस्तान स्वतःही दहशतवादाचा बळी ठरला असल्याचा दावा करत तरार यांनी आपल्या देशाची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला.

भारताच्या या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तानची मोठी कोंडी झाली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरून यावर काय प्रतिक्रिया उमटतात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >