Friday, October 2, 2026

Smit Machchhar : कॅप्टन स्मित मछार यांच्यावर सहवैमानिकाने हल्ला का केला ? नेतान्याहूंचा मोठा दावा

Smit Machchhar : कॅप्टन स्मित मछार यांच्यावर सहवैमानिकाने हल्ला का केला ? नेतान्याहूंचा मोठा दावा

Smit Machchhar : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने उड्डाण करणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात बुधवारी धक्कादायक प्रकार घडला. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच सह-वैमानिकाने कॅप्टन स्मित मछार यांच्यावर हल्ला केला. गंभीर दुखापत होऊनही कॅप्टन मछार यांनी विमानावरील नियंत्रण कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर कॅप्टन स्मित मछार यांच्या धैर्याचे कौतुक केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारतीय वैमानिकाचे कौतुक केले आहे.

नेतान्याहूंचा सह-वैमानिकाबाबत मोठा दावा

या घटनेबाबत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सह-वैमानिकाच्या पार्श्वभूमीबाबत काही गंभीर दावे केले आहेत. नेतान्याहू यांच्या म्हणण्यानुसार, सह-वैमानिकावर इस्लामी कट्टरतावादी विचारसरणीचा प्रभाव असल्याचे संकेत तपासातून मिळाले आहेत. ते म्हणाले की आम्हाला माहित आहे की त्याच्यावर इस्लामी कट्टरतावादी विचारसरणीचे संस्कार झाले होते. त्याच्या वैयक्तिक वस्तू आणि पार्श्वभूमीतून काही माहिती समोर आल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, नेतान्याहू यांनी या प्रकरणात अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष काढलेला नसल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या उपलब्ध असलेल्या माहितीतून काही संकेत मिळत असले तरी संपूर्ण तपास पूर्ण होणे आवश्यक आहे.

‘मला मारा’ अशी सह-वैमानिकाची हाक

नेतान्याहू यांनी पुढे म्हणाले की, ताब्यात घेतल्यानंतर सह-वैमानिकाने विमानातील कर्मचाऱ्यांना “मला मारा, मला मारा” असे ओरडत होता, हे स्पष्ट आहे की त्याला आत्महत्या करायची होती, यात काही शंका नाही. त्या माणसाला विमान पाडायचे होते, याची दाट शक्यता आहे.” ते पुढे म्हणाले, “मी तुम्हाला त्याच्या इस्लामी विचारांबद्दल आणि त्याच्या पार्श्वभूमीतील कट्टरतेबद्दल जे सांगितले, त्याच्याशी याची सांगड घातल्यास, मला वाटते की आपल्याला एक चांगला सुगावा लागेल. पण तरीही, मी कोणताही निष्कर्ष काढत नाहीये. सध्या आमच्याकडे फक्त हेच संकेत आहेत.”

हल्ल्यानंतर विमानाचे नियंत्रण कसे मिळवले ?

घटनेदरम्यान कॅप्टन स्मित मछार यांच्यावर हल्ला झाल्यानंतर विमानाच्या नियंत्रणावर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर प्रवासी आणि विमान कर्मचाऱ्यांनी कॉकपिटकडे धाव घेत सह-वैमानिकाला नियंत्रणात आणण्यास मदत केल्याची माहिती आहे. कॅप्टन मछार गंभीर जखमी झाल्याचे आणि त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झालाय. विमानातील एका दंतवैद्याने त्यांना प्राथमिक उपचार दिल्याची माहितीही समोर आली आहे. घटनेनंतर विमानातील दोन राखीव वैमानिकांनी विमानाचा ताबा घेतला आणि सौदी अरेबियातील तबूक विमानतळावर ते सुरक्षितपणे उतरवले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >