Friday, October 2, 2026

Aadi Anant Movie: "आदि अनंत" चित्रपटाची घोषणा, संकर्षण कऱ्हाडेची खास पोस्ट; म्हणाला, "सगळ्यांनी आयुष्यात अनुभवलेल्या नात्यावर..."

Aadi Anant Movie:

मुंबई: अभिनेता आणि कवी संकर्षण कऱ्हाडेचा लवकरच चाहत्यांच्या भेटीला नवाकोरा चित्रपट येत आहे. महेश लिमये दिग्दर्शित, "आदि अनंत" चित्रपटाचं पोस्टर संकर्षणने चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही तासांपूर्वीच सोशल मीडियावर संकर्षणने या चित्रपटाची घोषणा केली आहे. कायमच अभिनेता आणि कवी म्हणून चाहत्यांसमोर येणारा संकर्षण आता त्याच्या नव्या इनिंगला सुरूवात करतोय. या चित्रपटाच्या माध्यमातून संकर्षण कऱ्हाडे लेखक म्हणून आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय. लेखक म्हणून संकर्षणचा "आदि अनंत" हा चित्रपट पहिलाच आहे.

अशोक सराफ, संकर्षण कऱ्हाडे आणि सखी गोखले स्टारर "आदि अनंत" चित्रपट येत्या दिवाळीमध्ये रिलीज होणार आहे. संकर्षणचा लेखक म्हणून पहिला चित्रपट 12 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन महेश लिमये करणार असून चित्रपटाची निर्मिती कुमार पाठक, अभिषेक पाठक, समीर हंपी, महेश लिमये आणि अनिकेत मराठे करणार आहेत. तर, चित्रपटाची सहनिर्मिती दर्शन शाह आणि रविंद्र औटी करणार आहेत. पॅनोरमा स्टुडिओजच्या बॅनरखाली चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज केला जाणार आहे. चित्रपटाचं पोस्टर पाहून संकर्षण आणि अशोक सराफ यांच्यामध्ये बाप लेकाचं नातं उलगडणार असल्याचं कळतंय. त्यांच्यातील प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी आपल्याला चित्रपटाचा टीझर किंवा ट्रेलर रिलीज झाल्यानंतरच उलगडेल.

नात्यांमधल्या प्रेमाची, सहवासाची, आणि भावनांची गोष्ट हसतखेळत, धमाल करत सांगणाऱ्या "आदि अनंत" या आगामी मराठी चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं. चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण जेजुरीच्या खंडोबाचे आशिर्वाद घेत, रिलीज करण्यात आलं. पोस्टरमध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्यातील जिव्हाळ्याचं नातं दिसून येतंय. एका व्यक्तीच्या कुशीत दुसऱ्यानं विसावलेलं हे दृश्य परस्परांवरील विश्वास, आपलेपणा आणि भावनिक आधाराची जाणीव करून देतं. त्यामुळे "आदि अनंत" नेमक्या कोणत्या नात्याची गोष्टं सांगणार, याची उत्सुकता पोस्टरमधूनच निर्माण झाली आहे. संकर्षण कऱ्हाडे आणि अशोक सराफ यांच्यासोबत चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत, सखी गोखले, वैदेही परशुरामी, योगेश शिरसाट, कविता लाड, आरव आहिर श्रीरंग गोडबोले आणि गुरू ठाकूर अशी तगडी स्टारकास्ट आपल्याला चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणर आहे.

"आपण सगळ्यांनी आयुष्यात अनुभवलेल्या नात्यावर आम्ही चित्रपट केलाय "आदि अनंत"... देवाला नमस्कार करून हे पहिलं पोस्टर आपल्या सगळ्यांसाठी... मी लिहिलेला पहिला सिनेमा... अशोक सराफ सरांसोबत माझा पाहिला सिनेमा... नात्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट "सहवास" जो नशिबात असल्याशिवाय मिळत नाही... आणि सगळ्यात त्रास देणारी गोष्ट "पश्चात्ताप" जो झाल्याशिवाय रहात नाही... आपल्या माणसांच्या कुशीत डोकं ठेवून शांत पडून रहाण्यासारखं मेडिटेशन नाही आणि प्रेमाच्या मिठीने शांत होणार नाही अशी कोणतीही जनरेशन नाही...!!! प्रत्येक पिढीतल्या प्रत्येकाची धमाल कमाल आणि प्रेमळ गोष्ट "आदि अनंत..." नक्की पहा ... १२ नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या आणि लांबच्या चित्रपटगृहात...", चित्रपटाचं पोस्टर शेअर करताना संकर्षण कऱ्हाडेने अशी इन्स्टा पोस्ट शेअर केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >