Friday, October 2, 2026

Nashik : नाशिक महापालिकेच्या पाच विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुका जाहीर

Nashik :  नाशिक महापालिकेच्या पाच विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुका जाहीर

Nashik : नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण, शिक्षण, शहर सुधारणा, विधी तसेच वैद्यकीय व आरोग्य या पाच विषय समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी निवडणूक कार्यक्रम घोषित केला असून, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

महिला व बालकल्याण समिती आणि शिक्षण समितीच्या सभापती-उपसभापती पदांसाठी ८ ऑक्टोबरला, तर शहर सुधारणा, विधी तसेच वैद्यकीय व आरोग्य समितीच्या सभापती-उपसभापती पदांसाठी ९ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. महिनाभरापूर्वी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी महासभेत या पाचही विषय समित्यांवरील सदस्यांची नियुक्ती जाहीर केली होती. महापालिकेतील पक्षीय संख्याबळानुसार झालेल्या या नियुक्त्यांमध्ये सत्तारूढ भाजपचे वर्चस्व कायम राहिले आहे.

समित्यांवर भाजपचे वर्चस्व

नऊ सदस्यीय प्रत्येक समितीवर भाजपचे पाच, शिवसेना शिंदे गटाचे दोन, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा प्रत्येकी एक सदस्य आहे. विधी समितीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत एका अपक्ष नगरसेवकालाही संधी देण्यात आली आहे.महापालिकेत भाजपकडे १२२ पैकी ७२ नगरसेवकांचे संख्याबळ असल्याने पाचही विषय समित्यांवर सत्तारूढ पक्षाचे वर्चस्व आहे. सदस्य नियुक्ती झाल्यानंतर सुमारे महिनाभर सभापतीपदाच्या निवडणुकीची प्रतीक्षा होती. महापौरांकडून सदस्य नियुक्तीचा ठराव प्राप्त झाल्यानंतर नगरसचिव विभागाने निवडणुकीसाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानंतर आता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

६ ऑक्टोबरला अर्ज दाखल करण्याची मुदत

विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. उमेदवारी अर्ज ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत नगरसचिव कार्यालयात दाखल करता येणार आहेत. निवडणूक सभांचे कामकाज महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात होणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

- उमेदवारी अर्ज स्वीकृती : ६ ऑक्टोबर, सकाळी १० ते दुपारी १२.३०

- महिला व बालकल्याण समिती सभापती : ८ ऑक्टोबर, दुपारी ३.३०

- शिक्षण समिती सभापती : ८ ऑक्टोबर, सायंकाळी ५

- शहर सुधारणा समिती सभापती : ९ ऑक्टोबर, सकाळी १०

- विधी समिती सभापती : ९ ऑक्टोबर, सकाळी ११.३०

- वैद्यकीय व आरोग्य समिती सभापती : ९ ऑक्टोबर, दुपारी १

सभापतीपदाची निवड बिनविरोध होण्याची शक्यता

पाचही विषय समित्यांमध्ये भाजपचे पाच आणि शिंदे गटाचे दोन असे सत्तारूढ आघाडीचे सात सदस्य आहेत. त्यामुळे सभापतीपदासाठी सत्तारूढ गटाकडे स्पष्ट बहुमत आहे. विरोधकांचे संख्याबळ तुलनेने कमी असल्याने पाचही समित्यांच्या सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >