बुधवारी (३० सप्टेंबर २०२६) फ्लायदुबई FZ1073 विमानात झालेला थरार कोणीही विसरू शकत नाही. विमानाचे कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर सह पायलटने हल्ला करून देखील प्रसंगावधान राखत त्यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडला ज्यामुळे प्रवासी त्यांच्या मदतीसाठी येऊ शकले. यानंतर त्यांनी सौदी अरेबिया येथे सुरक्षितपणे विमान उतरवले आणि १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले. त्यांच्या या धाडसाचं कौतुक संपूर्ण जगभरात होतंय. अशीच एक घटना इतिहासात देखील होऊन गेली. बुधवारी फ्लाय दुबई विमानात झालेल्या घटनेनंतर नीरजा भानोत यांच्या १९८६ च्या धैर्याची आठवण करून देणं हेदेखील तितकंच महत्त्वाचं आहे.
नीरजा भानोत या पॅन एम फ्लाईट ७३ मध्ये वरिष्ठ कार्यकारी पर्सर म्हणून कार्यरत होत्या. ७ सप्टेंबर १९६३ रोजी चंदिगढ येथे जन्मलेल्या नीरजा भानोत या वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी विमानातील प्रवाशांना वाचवताना शहिद झाल्या. ५ सप्टेंबर १९८६ रोजी पॅन एम फ्लाईट ७३ हे विमान मुंबईहून फ्रँकफर्ट आणि न्यूयॉर्कला जात असताना कराची येथे उतरले होते. यावेळी सकाळी सहाच्या सुमारास चार सशस्त्र व्यक्तींनी या विमानाचे अपहरण केले. विमानतळाची सुरक्षा यंत्रणा मोडीत काढत ते विमानात शिरले. यावेळी विमानात ३६० प्रवासी आणि १९ क्रू सदस्य होते. या ४ जणांनी स्वतःसह संपूर्ण विमानाला उडवून टाकण्याचा कट रचला होता. विमानात काहीतरी घडत असल्याचे लक्षात येताच नीरजा यांनी वैमानिकांना सावध केले ज्यामुळे वैमानिक, को पायलट आणि इतर सहकार्यांना आपत्कालीन एक्सिटमधून बाहेर पडण्यात यश आले.
Flydubai Incident : दुबईवरुन इस्त्रायलच्या तेल अवीवला जाणारे फ्लाय दुबईचे (Fly dubai) प्रवासी विमान क्रॅश होण्यापासून वाचवणारे भारतीय कॅप्टन स्मित मच्छार (Smit Machchhar) यांचे ...
अपहरणकर्त्यांनी जवळपास १६ ते १७ तास प्रवासी आणि इतर कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले होते. वैमानिक आणि सहकारी विमानातून बाहेर पडले असले तरी प्रवाशांची जबाबदारी घेऊन भानोत या विमानातच थांबल्या आणि प्रवाशांना वाचवण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरु झाला. दहशतवाद्यांनी विमानात गोळीबार चालू केला परंतु नीरजा यांनी धाडसीपणे प्रवाशांना शांत ठेवण्यात आणि विमानातून बाहेर काढण्यासाठी संयम दर्शवत मोलाची भूमिका बजावली. विमानातून बाहेर पडण्याची संधी वारंवार समोर असूनदेखील नीरजा या आपल्या कर्तव्याशी तत्पर होत्या. विमानातील ३५० लोकांचे प्राण वाचले होते. पण ३ लहान मुलं अजूनही विमानात अडकलेली होती या मुलांना गोळीबारापासून वाचवण्यासाठी नीरजा यांनी प्राणपणाला लावून प्रयत्न केले. या ३ मुलांचा जीव वाचवण्यामध्ये त्यांना यश आलं. परंतु, मुलांना विमानातून बाहेर काढत असताना अपहरणकर्त्यांची नजर नीरजा यांच्यावर गेली. आतंकवाद्यांच्या गोळीपासून त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले पण त्यांची प्राणज्योत मात्र मालवली. या घटनेत २२ जणांचा मृत्यू झाला तर १५० हून अधिक प्रवासी जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, हे चार आतंकवादी पॅलेस्टिन होते. नीरजा यांच्या कंबरेला गोळी लागली होती आणि त्या रक्तबंबाळ झाल्या होत्या. त्यांच्या सहकार्यांनी त्यांना कराचीच्या जिन्ना रुग्णालयात दाखल केलं. परंतु त्यांना मरण प्राप्त झालं.
अधिक दुःखद गोष्ट म्हणजे, ५ सप्टेंबर रोजी ही घटना घडली. आपल्या वाढदिवसाच्या अवघ्या २ दिवसांआधी नीरजा यांना देवाज्ञा झाली. परंतु त्यांच्या धैर्य, धाडस आणि संयमामुळे त्या आजही आठवणीत आहेत. भारत सरकारकडून त्यांना १९८७ मध्ये मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आले. देशाचा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार मिळवणाऱ्या त्या सर्वात तरुण आणि पहिल्या महिला ठरल्या.





