Saturday, October 3, 2026

ठाकरे बंधू तुकडे-तुकडे गँगचे सदस्य झालेत का? - मंत्री नितेश राणे यांचा सवाल

ठाकरे बंधू तुकडे-तुकडे गँगचे सदस्य झालेत का? - मंत्री नितेश राणे यांचा सवाल

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनात उमर खालिद आणि शर्जील इमामच्या समर्थनार्थ फलक झळकविण्यात आल्याचा दावा करीत, त्या आंदोलनाला ठाकरे बंधूंनी पाठिंबा दिल्याने ते आता ‘तुकडे तुकडे गँग’चे सदस्य झाले आहेत का, असा सवाल मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी शनिवारी कणकवलीत केला.

सीजेपीचे आंदोलन निवडणूक आयोगाच्या विरोधातील असले तरी त्यात ‘उमर खालिदला मुक्त करा’, ‘शर्जील इमामला मुक्त करा’ अशा घोषणा आणि फलक असल्याचे राणे यांनी सांगितले. देशविरोधी शक्तींना समर्थन देणाऱ्या या आंदोलनाला ठाकरे बंधूंनी पाठिंबा दिला असल्याने त्यांच्या भूमिकेचे स्पष्टीकरण अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. राज आणि उद्धव ठाकरे यांनी ४ ऑक्टोबरला निवडणूक आयोगाच्या विरोधात संयुक्त मोर्चाची घोषणा केली आहे.

मतदारयादीवर प्रश्न उपस्थित करताना दादर, वरळी आणि बारामतीतील निवडणुकांबाबतही ठाकरे आणि काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राणे यांनी केली. दादरमध्ये महेश सावंत, वरळीत आदित्य ठाकरे आणि बारामतीतील निवडणुकीत मतदारयादीत घोळ झाला नव्हता का, असा सवाल त्यांनी केला. वायनाड आणि उत्तर प्रदेशातील निवडणुकांबाबतही काँग्रेसने उत्तर द्यावे, असे ते म्हणाले.

शिवाजी पार्कमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका मांडली होती. त्याच ठिकाणी उमर खालिदच्या समर्थनार्थ घोषणा होत असतील आणि त्याला ठाकरे बंधू पाठिंबा देत असतील, तर ही बाळासाहेबांच्या विचारांशी विसंगत भूमिका असल्याची टीका राणे यांनी केली. मतदारयादीच्या मुद्द्यावरून बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांच्या समावेशाचा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. एसआयआरच्या माध्यमातून निवडणूक आयोग अशा प्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी भाजपवर प्रादेशिक पक्ष संपविण्याचा आरोप केल्याबद्दलही राणे यांनी प्रश्न उपस्थित केला. निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीशी शिवसेना, राष्ट्रवादी किंवा अन्य पक्ष फोडण्याच्या आरोपांचा काय संबंध, असा सवाल त्यांनी केला.

एमपीएससीवरून पटोलेंना प्रत्युत्तर

  • एमपीएससीच्या अध्यक्षांवर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलेल्या आरोपांवरही राणे यांनी प्रतिक्रिया दिली. एमपीएससीच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती स्थापन केली असून विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे माध्यमांमध्ये राहण्यासाठी राजकीय आरोप करण्याऐवजी सरकारच्या उपाययोजनांबाबत सूचना द्याव्यात, असे ते म्हणाले.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अभिजीत दिपके यांनी केलेल्या टीकेवरूनही राणे यांनी निशाणा साधला. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर वैयक्तिक टीका करणाऱ्यांची भाषा पाकिस्तानसारखी असल्याचा आरोप त्यांनी केला. देशाच्या पंतप्रधानपदाचा सन्मान राखला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >