Monday, October 5, 2026

Sarvapitru Amavasya 2026 : पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहित नाही, ‘हा’ दिवस ठरणार महत्त्वाचा ! संपूर्ण पितृपक्षाचं पुण्य मिळवण्याची विशेष संधी

Sarvapitru Amavasya 2026 : पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहित नाही, ‘हा’ दिवस ठरणार महत्त्वाचा ! संपूर्ण पितृपक्षाचं पुण्य मिळवण्याची विशेष संधी

Sarvapitru Amavasya 2026 : हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील शेवटची तिथी म्हणजेच सर्वपितृ अमावस्या. यंदा सर्वपितृ अमावस्या शनिवार, 10 ऑक्टोबर 2026 रोजी पाळली जाणार आहे. पितृपक्षातील हा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. पितृपक्षात पूर्वजांच्या मृत्यू तिथीनुसार श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करण्याची परंपरा आहे. मात्र, ज्या पूर्वजांची मृत्यू तिथी माहीत नाही किंवा एखाद्या कारणामुळे ठरलेल्या तिथीला श्राद्ध करता आले नाही, अशांसाठी सर्वपितृ अमावस्या महत्त्वाची मानली जाते. या दिवशी ज्ञात-अज्ञात सर्व पितरांचे स्मरण करून श्राद्ध आणि तर्पण करता येते.

मृत्यू तिथी माहीत नसल्यास सर्वपितृ अमावस्या महत्त्वाची

काही वेळा पूर्वजांची मृत्यू तिथी माहीत नसते किंवा तिथी लक्षात राहत नाही. अशा वेळी सर्वपितृ अमावस्येच्या दिवशी त्यांचे श्राद्ध करता येते,.ज्यांना आपल्या पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथी माहीत नाहीत, त्यांच्यासाठी सर्वपित्री अमावस्येचा दिवस खूप विशेष आहे. ज्या कुटुंबातील सदस्यांच्या किंवा पूर्वजांच्या मृत्यूची किंवा श्राद्धाची तिथी माहीत नाही, त्यांचे श्राद्ध सर्वपित्रीच्या दिवशी एकत्र केले जाऊ शकते. शास्त्रानुसार, या विशेष दिवशी केलेले श्राद्ध सर्व ज्ञात आणि अज्ञात पूर्वजांपर्यंत थेट पोहोचते. जेव्हा आपण पूर्ण भक्तीभावाने त्यांचे ध्यान करतो, तेव्हा ते संतुष्ट होतात. यानंतर, ते प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व वंशजांना सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्याचा दिव्य आशीर्वाद देतात, ज्यामुळे कुटुंबात निरंतर समृद्धी टिकून राहते.

पितृपक्षात श्राद्ध करता आले नसेल तर ‘हा’ दिवस महत्त्वाचा

काही कारणांमुळे संपूर्ण पितृपक्षात श्राद्ध किंवा तर्पण करता आले नसेल, तरी सर्वपितृ अमावस्येच्या दिवशी पितरांचे स्मरण करून धार्मिक विधी करण्याची परंपरा आहे. या दिवशी श्रद्धेने केलेले तर्पण आणि पिंडदान पितरांना अर्पण केले जाते. यासोबतच पंचबली देण्याचीही परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार पंचबलीद्वारे देव, गाय, कुत्रा, कावळा आणि मुंग्या यांच्यासाठी अन्न अर्पण केले जाते.

सर्वपितृ अमावस्येला पंचबली कसा द्यावा ?

सर्वपितृ अमावस्येच्या दिवशी भोजन तयार झाल्यानंतर त्यातील काही भाग पाच ठिकाणी अर्पण करण्याची पद्धत आहे.

- देवासाठी अन्नाचा नैवेद्य अर्पण करावा.

- गाईसाठी अन्नाचा भाग काढावा.

- कुत्र्यासाठी अन्न अर्पण करावे.

- कावळ्यासाठी अन्नाचा भाग ठेवावा.

- मुंग्यांसाठी अन्न किंवा गोड पदार्थ अर्पण करावा.

धार्मिक श्रद्धेनुसार, या पंचबलिमुळे पितरांची तृप्ती होते आणि त्यांचे आशीर्वाद कुटुंबाला मिळतात. घरात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य नांदावे, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते.

पितरांच्या स्मरणाचा विशेष दिवस

सर्वपितृ अमावस्या हा केवळ पितृपक्षाचा शेवटचा दिवस नसून आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मानली जाते. त्यामुळे या दिवशी श्रद्धा आणि भक्तिभावाने पितरांचे स्मरण करून तर्पण, श्राद्ध तसेच पंचबली करण्याची परंपरा आहे.

टीप : वरील माहिती धार्मिक श्रद्धा आणि प्रचलित परंपरांवर आधारित आहे. विधी, मुहूर्त आणि स्थानिक परंपरांमध्ये फरक असू शकतो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >