Monday, October 5, 2026

Chhatrapati Sambhajinagar Accident : पैठणमध्ये एसटी बसची दुचाकीला धडक; 5 वर्षांच्या चिमुकलीसह तिघांचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar Accident : पैठणमध्ये एसटी बसची दुचाकीला धडक; 5 वर्षांच्या चिमुकलीसह तिघांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : पैठण शहरात एसटी बसने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत 5 वर्षांच्या चिमुकलीसह तिघांचा मृत्यू झाला. हा अपघात शहरातील एका कापड दुकानासमोर घडला. मृतांमध्ये वडील आणि त्यांच्या मुलीचा समावेश आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या अपघातात कृष्णा अशोक गायकवाड (25), त्यांची 5 वर्षांची मुलगी छकुली कृष्णा गायकवाड आणि अशोक गणेश भालेराव यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पैठण पोलिसांनी संबंधित एसटी बस ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा गायकवाड आणि अशोक भालेराव हे साडू आहेत. दोघेही छकुलीसोबत दुचाकीवरून पैठणहून आगरनांदरच्या दिशेने जात होते. त्याचवेळी छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक 2 ची एसटी बस पैठण शहरातून जात होती. शहरातील एका कापड दुकानासमोर बसने त्यांच्या दुचाकीला मागून जोराची धडक दिली.

धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर पडले. या अपघातात तिघांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी मदतकार्य करत तिघांचे मृतदेह पैठण ग्रामीण रुग्णालयात पाठवले.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पैठण पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. पोलिसांनी अपघातग्रस्त एसटी बस ताब्यात घेतली असून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

अशोक भालेराव यांच्या पश्चात आई, पत्नी, 3 मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. तर कृष्णा गायकवाड यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. या अपघातामुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >