Sunday, October 4, 2026

कॅप्टन मच्छार यांच्या कुटुंबीयांना BMC च्या महापौर रितू तावडे यांची सदिच्छा भेट, स्मित यांच्या तब्येतीची केली विचारपूस

कॅप्टन मच्छार यांच्या कुटुंबीयांना BMC च्या महापौर रितू तावडे यांची सदिच्छा भेट, स्मित यांच्या तब्येतीची केली विचारपूस

मुंबई: दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या 'फ्लाई- दुबई' कंपनीच्या विमानामध्ये सह वैमानिकाकडून झालेल्या प्राणघातक चाकू हल्ल्यामध्ये कॅप्टन स्मित मच्छार गंभीर जखमी झाले होते. आकाशात 35,000 फूट उंच असताना कॉकपिटमध्ये हा हल्ला झाला असताना जीवाची बाजी देत शौर्य दाखवत कॅप्टन मच्छार यांनी सुखरूपपणे 180 प्रवाशांचे प्राण वाचवले. त्यांनी सौदी अरेबियामध्ये सुखरूप पद्धतीने विमान खाली उतरवले. सध्या कॅप्टन मच्छार यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मच्छार कुटुंबीयांची भेट घेतली होती. आता त्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या महापौर रितू तावडे यांनीही मच्छार कुटुंबीयांची घाटकोपरमध्ये भेट घेतली.

महानगर पालिकेच्या महापौर रितू तावडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, मच्छार कुटुंबीयांच्या भेटी दरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. मच्छार कुटुंबीयांची रितू तावडे सदिच्छा भेट घेतली. मुंबईतील घाटकोपर (पूर्व) येथील 'धवलगिरी' इमारतीत वास्तव्यास असणारे कॅप्टन मच्छार यांचे चुलते किशोर मच्छार यांच्या निवासस्थानी जाऊन महापौरांनी भेट घेतली. त्यावेळी स्मित यांच्या प्रकृतीची माहिती घेत आस्थेने विचारपूस केली. श्री. स्मित यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही केली. विशेष म्हणजे, मच्छार कुटुंबीयांचे ज्या प्रभागात घर आहे, तो प्रभाग क्रमांक 132 हा स्वतः महापौर श्रीमती रितू तावडे यांचा नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व असलेला प्रभाग आहे.

आपल्याच नगरसेवक प्रभागातील आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या सुपुत्राच्या कुटुंबियांची भेट घेत महापौरांनी संपूर्ण प्रभाग आणि मुंबईकरांच्या वतीने मच्छार कुटुंबियांना पाठबळ दिले. महापौर रितू तावडे यांच्यासह आमदार पराग शाह, नगरसेवक धर्मेश गिरी, नगरसेविका राखी जाधव यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. दरम्यान, दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात 30 सप्टेंबर रोजी घडलेल्या जीवघेण्या प्रसंगात कॅप्टन स्मित मच्छार यांनी रक्ताच्या थारोळ्यात असतानाही असीम संयम दाखवत आणि विमानाचे यशस्वी इमर्जन्सी लँडिंग करून नवा इतिहास घडवला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील नेत्यांनी स्मित यांच्या या धाडसाचे कौतुक केले आहे. या पार्श्वभूमीवर महापौर रितू तावडे यांनी मच्छार कुटुंबीयांशी संवाद साधत कॅप्टन श्री. स्मित यांच्या उपचारांची आणि प्रकृतीत होत असलेल्या सुधारणेची माहिती जाणून घेतली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा